
पुणे, दि. २७ जून : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने जीवे मारण्याची तसेच बांधकाम पाडण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक केली आहे. आरोपींकडून एकूण ७ लाख ९ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तक्रारदार यांनी कात्रज येथील मांगडेवाडी परिसरात ममता फाउंडेशनसाठी इमारत तसेच राहण्यासाठी दोन घरे बांधली होती. या बांधकामाबाबत वारंवार महापालिकेकडे तक्रारी करून बांधकाम पाडण्याची धमकी देत, “तक्रार थांबवायची असेल तर १० लाख रुपये द्या,” अशी मागणी आरोपींनी केली. आरोपींनी तक्रारदाराकडून टायटन कंपनीचे घड्याळ, ऑनलाइन १० हजार रुपये तसेच गुगल पेद्वारे ५ हजार रुपयेही स्वीकारल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ३०८(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपींनी खंडणीपैकी ५० हजार रुपये कात्रज येथील किनारा हॉटेल येथे स्वीकारण्याचे सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून विनोद गायकवाड आणि संग्राम सोनवणे यांना ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर इतर आरोपींनाही अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
विनोद निवृत्ती गायकवाड (वय ४३)
संग्राम दत्तात्रय सोनवणे (वय ३०)
सुधीर मुगुट शेडगे (वय ३८)
निलेश बबन कुंभार (वय ४२)
या आरोपींकडून एकूण ७,०९,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते करत आहेत. या आरोपींनी इतर कोणाकडूनही धमकावून खंडणी उकळली असल्यास नागरिकांनी पुढे येऊन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…