
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात आपत्कालीन आरोग्य सेवेत गंभीर त्रुटी समोर येत असून, खासगी रुग्णवाहिका चालकांकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत आमदार Sunil Shelke यांनी आरोग्यमंत्री Prakash Abitkar यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिक सर्वप्रथम ‘१०८’ रुग्णसेवेचा आधार घेतात. मात्र, ही सेवा वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. रुग्णवाहिका उशिरा पोहोचणे किंवा प्रतिसाद न मिळणे यामुळे रुग्णांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अशा परिस्थितीत नातेवाईकांना खासगी रुग्णवाहिका बोलवावी लागते. याचा गैरफायदा घेत काही चालकांकडून ८ ते १० हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पर्याय नसल्याने नागरिकांना ही रक्कम देण्याशिवाय पर्याय राहत नाही.
याशिवाय, काही खासगी रुग्णवाहिका चालक रुग्णांना ठराविक खासगी रुग्णालयांमध्येच दाखल करत असल्याचा संशयही व्यक्त होत आहे. यामागे चालक आणि रुग्णालयांमध्ये संगनमत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे रुग्णवाहिका सेवेत एक संघटित रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री आबिटकर यांनी संबंधित विभागाला चौकशीचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, कान्हे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक रोहित काळे यांनी सांगितले की, ‘१०८’ रुग्णसेवेचे नियोजन जिल्हास्तरावरून केले जाते आणि त्यावर स्थानिक नियंत्रण नसते. मावळ तालुक्यात सध्या ‘१०८’ सेवेसाठी ९ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. तसेच ‘१०२’ सेवेसाठी कान्हे ग्रामीण रुग्णालयात दोन रुग्णवाहिका कार्यरत आहेत.
**ठळक मुद्दे :**
• ‘१०८’ रुग्णसेवेचे बुकिंग जिल्हास्तरावरून होते
• मावळ तालुक्यात स्थानिक नियंत्रण नसल्याची माहिती
• ‘१०८’ सेवेसाठी ९ रुग्णवाहिका उपलब्ध
• ‘१०२’ सेवेसाठी कान्हे ग्रामीण रुग्णालयात २ रुग्णवाहिका उपलब्ध
या प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, तातडीने ठोस कारवाईची मागणी होत आहे.

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…