July 29, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात; कंटेनर-ट्रक धडकेत चालकाचा मृत्यू, एकलहरे येथे वाहतूक विस्कळीत

मंचर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी (३१ मार्च) रात्री उशिरा भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने पुढे चाललेल्या मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव गणेश शशिकांत टपाल (वय ३५, रा. टेमगिरी, ता. संगमनेर) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल दामोदर उगले (रा. सिन्नर) हे आपला ट्रक (एमएच १४ सीके ४३२९) घेऊन नाशिकच्या दिशेने जात होते. त्याच वेळी मागून वेगाने आलेल्या आयशर कंटेनरने (एमएच १४ एलएल ६६८१) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कंटेनरचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला आणि चालक केबिनमध्ये अडकून पडला.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. सिद्धेश बोंबे, रामचंद्र गाडे, संदेश गाडे, आयुब शेख, रवी कानडे आणि सचिन मोढवे यांनी जेसीबीच्या साहाय्याने सुमारे अर्धा तास प्रयत्न करून चालकाला बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.

Spread the love