लोकसंख्या वाढीवरील वक्तव्यावरून नवनीत राणा आणि असुद्दीन ओवेसी यांच्यात शाब्दिक संघर्ष. AIMIM पक्षावर कठोर कारवाईची मागणी करत राणांचा जोरदार हल्लाबोल.

राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत असून, एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना माजी खासदार नवनीत राणा यांनी ओवेसींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अमरावती दौऱ्यावर असताना असुद्दीन ओवेसी यांनी लोकसंख्या वाढीबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याआधी नवनीत राणा यांनी केलेल्या “चार मुलं जन्माला घाला” या विधानावर प्रतिक्रिया देताना ओवेसी यांनी, “चार नाही तर आठ करा, आम्हाला काय करायचं?” असे वादग्रस्त विधान केले होते.
या विधानावर संतप्त प्रतिक्रिया देत नवनीत राणा यांनी थेट ओवेसी आणि त्यांच्या पक्षावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, देशात लोकशाही आणि संविधानाचे महत्त्व काय आहे, यावर ओवेसींनी आधी बोलायला हवे. लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप करणारे नेते स्वतः मात्र संविधानाचा सन्मान करत नसल्याचे चित्र दिसते, अशी टीकाही त्यांनी केली.
नवनीत राणा यांनी पुढे स्पष्ट केले की, भारतात राहायचे असेल तर संविधान मान्य करणे आवश्यक आहे. देशभक्तीच्या घोषवाक्यांपासून दूर राहणाऱ्या लोकांची राष्ट्रनिष्ठा संशयास्पद ठरते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खासदार असूनही संविधानाचा सन्मान न केल्याचा आरोप त्यांनी ओवेसींवर केला.
एमआयएम पक्षावर टीका करताना नवनीत राणांनी निवडणूक आयोगाने या पक्षाच्या मान्यतेबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी केली. अशा प्रकारच्या विचारसरणीला लोकशाही व्यवस्थेत स्थान नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच ओवेसी यांच्या वक्तव्यांमुळे देशातील सामाजिक सलोख्याला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही दिला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यासह राष्ट्रीय राजकारणातही मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता असून, आगामी काळात या वक्तव्यांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

More Stories
शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे क्रीडा शिक्षकाला घरात घुसून मारहाण; विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत केली कारवाईची मागणी…
आळेफाटा येथे पिकअप आणि बोलेरो यांच्यात भीषण अपघात; एक ठार, नऊ जखमी
बारावी विज्ञान शाखेचा फिजिक्स-केमिस्ट्री पेपर फुटला; नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल