पुढील ४ वर्षे सोलापूर महामार्ग ठप्प होण्याचा धोका; रस्ता अधिक अरुंद होणार, चाकरमान्यांच्या रोजच्या प्रवासाचे काय? शासनाचा ‘फ्युचर प्लॅन’ शून्य?

लोणी काळभोर / उरुळी कांचन (सुनित जैनजांगडे):
पुणे: हडपसर ते यवत दरम्यान उभारल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित ६ लेन उन्नत महामार्ग (Elevated Highway) व मेट्रो प्रकल्पाच्या कामाला मंजुरी मिळून नुकतेच भूमिपूजन झाले आहे. मात्र, सध्या सुरुवातीच्या टप्प्यात अवघ्या काही ठिकाणी सुरू असलेल्या ‘सोईल टेस्टिंग’नेच (जमिनीची चाचणी) पुणे-सोलापूर महामार्गाची दैना उडवली आहे. आज जर केवळ चाचणीदरम्यान एक ते दीड किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागत असतील, तर भविष्यात जेव्हा प्रत्यक्ष महामार्गाच्या मधोमध अथांग बॅरिकेडिंग करून पिलर (खांब) उभारणीचे काम पूर्ण क्षमतेने सुरू होईल, तेव्हा या महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रचंड उद्रेक अटळ मानला जात आहे.
भविष्यातील भीषण चित्र: रस्ता अधिक अरुंद अन् प्रवास २ ते ३ तासांचा!
प्रकल्पाच्या नियोजनानुसार पुढील चार वर्षे महामार्गावर अहोरात्र पिलर उभारणीचे आणि उड्डाणपुलाचे काम चालणार आहे. पिलरच्या पायाभरणीसाठी महामार्गाचा मध्यभाग १५ ते २० फूट रुंदीपर्यंत बॅरिकेड्स लावून पूर्णपणे बंद केला जाईल. यामुळे सध्याचा रुंद महामार्ग अत्यंत अरुंद (Narrow) होणार असून, दुतर्फा केवळ एक-एक किंवा दोनच लेन वाहतुकीसाठी शिल्लक राहतील.
याचा थेट फटका लोणी काळभोर, उरुळी कांचन, कुंजीरवाडी, थेऊर, कदमवाकवस्ती आणि यवत या ग्रामीण परिसरातून रोज नोकरी, शिक्षण व व्यवसायानिमित्त पुण्यात ये-जा करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना बसणार आहे. आज सोईल टेस्टिंगमुळे अर्ध्या तासाचा प्रवास दीड तासावर गेला आहे; पण पुढे रस्ता आणखी अरुंद झाल्यावर हाच प्रवास ३ ते ४ तासांचा नरकप्रवास बनण्याची भीती व्यक्त होत आहे.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय वाहतूक ‘ट्रॅफिक ट्रॅप’मध्ये अडकणार
हा महामार्ग केवळ स्थानिक वाहतुकीपुरता मर्यादित नसून सोलापूर, बारामती, इंदापूर, धाराशिव, पंढरपूर तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून येणाऱ्या अवजड मालवाहतूक ट्रक्स, टँकर्स आणि एसटी बसेसचा मुख्य दुवा आहे. प्रत्यक्ष पिलरचे काम सुरू झाल्यावर रोज हजारो अवजड वाहने या अरुंद पट्ट्यात तासनतास अडकून पडतील. त्यातच जर एखादे अवजड वाहन मध्यभागी बंद पडले किंवा अपघात झाला, तर संपूर्ण महामार्ग २ ते ४ किलोमीटरपर्यंत पूर्ण ठप्प होईल अशी भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे.
भविष्यातील गंभीर संकटावर शासनाला व महामार्ग प्राधिकरणाला खडे सवाल:
- ‘मास्तर ट्रॅफिक प्लॅन’ कुठे आहे?: पुढील ४ वर्षांच्या भीषण कोंडीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSRDC) आणि पुणे वाहतूक पोलिसांनी कोणता दीर्घकालीन ट्रॅफिक प्लॅन आखला आहे?
- सेवा रस्त्यांचे (Service Roads) सक्तीचे रुंदीकरण कधी?: मुख्य रस्ता अरुंद झाल्यावर सर्व वाहतुकीचा भार सर्व्हिस रोडवर पडणार आहे. मग सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटवून त्यांचे रुंदीकरण आणि डांबरीकरण आधी का केले जात नाही?
- जड वाहतुकीसाठी ‘बायपास’ मार्ग आखणार का?: सोलापूर आणि बारामतीकडून येणाऱ्या अवजड वाहनांना सासवड-जेजुरी किंवा शिरूर-अहिल्यानगर मार्गे वळवण्याचा अधिकृत पर्यायी मार्ग शासन कधी घोषित करणार?
- आपत्कालीन गाड्यांसाठी काय मार्ग?: रुग्णवाहिका (Ambulance) आणि अग्निशामक दलाच्या गाड्या या वाहतूक कोंडीत अडकल्यास होणाऱ्या जीवितहानीला जबाबदार कोण राहणार?
- धुळीचा अन् प्रदूषणाचा धोका कसा रोखणार?: पुढील ४ वर्षे अहोरात्र उडणाऱ्या धुळीमुळे रस्त्यालगतचे नागरिक आणि प्रवाशांच्या आरोग्याची होणारी हानी रोखण्यासाठी काय खबरदारी घेतली जाणार?
स्थानिक नागरिक व चाकरमान्यांची विनंती
“उन्नत मार्ग हा भविष्यातील विकासासाठी गरजेचा आहे, यात शंका नाही. पण आज आणि पुढील ४ वर्षे आमचा रोजचा प्रवास नरक बनवून चालणार नाही. प्रशासनाने प्रत्यक्ष पिलरचे काम सुरू करण्यापूर्वीच पर्यायी रस्ते सुस्थितीत करावेत, सर्व्हिस रोड रुंद करावेत आणि २४ तास वाहतूक पोलिसांचे कडक नियंत्रण ठेवावे.” अशी विनंती लोणी काळभोर, उरुळी कांचन व यवत परिसरातील रहिवाशी केली आहे.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…