March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

नारायण राणेंची तब्येत स्थिर; ‘शुगर वाढल्याने चक्कर आली’, राजकीय निवृत्तीच्या चर्चांना दिला पूर्णविराम

चिपळूणमधील कार्यक्रमात भोवळ आल्यानंतर नारायण राणेंनी तब्येतीबाबत माहिती दिली. शुगर वाढल्याने अस्वस्थपणा झाला असून राजकीय निवृत्तीच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.

सिंधुदुर्ग |

भाजप नेते, माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांना चिपळूणमधील एका कार्यक्रमात भाषण करत असताना अचानक अस्वस्थ वाटल्याने कार्यक्रमात एकच खळबळ उडाली. भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना चक्कर आल्यासारखे वाटू लागले, आवाजही बसल्याने त्यांनी भाषण थांबवले आणि कार्यक्रमस्थळावरून थेट गेस्ट हाऊसकडे रवाना झाले.

या घटनेनंतर नारायण राणेंच्या तब्येतीबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, आता स्वतः राणेंनी माध्यमांशी संवाद साधत संपूर्ण परिस्थिती स्पष्ट केली आहे. “माझी तब्येत आता पूर्णपणे ठीक आहे,” असे त्यांनी सांगितले.

राणेंनी माहिती देताना सांगितले की, भाषणादरम्यान त्यांचे ब्लड प्रेशर कमी झाले होते आणि डायबेटिसची शुगर पातळी ३२५ च्या पुढे गेली होती. त्यामुळे अचानक अस्वस्थपणा आणि चक्कर आली. मात्र, योग्य उपचारानंतर सध्या कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, याच कार्यक्रमात राणेंनी केलेल्या एका विधानामुळे त्यांच्या राजकीय निवृत्तीची चर्चा सुरू झाली होती. यावर पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया देताना नारायण राणे म्हणाले की, “मी निवृत्त होतो असे कुठेही म्हटलेले नाही. माझे वक्तव्य चुकीच्या अर्थाने घेतले गेले.”

आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, जर आपल्या पदाचा उपयोग जनतेसाठी होत नसेल, तर त्या पदाचा अर्थ काय, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. मात्र, राजकारणातून निवृत्त होण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

सिंधुदुर्गातील सभेत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत राणेंनी सांगितले की, आपण माणुसकी, साधेपणा आणि सामान्य जनतेशी नातं जपतो, हेच अधोरेखित करण्यासाठी ते शब्द वापरले होते. मात्र, त्याचा अर्थ राजकीय संन्यास असा काढणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या स्पष्टीकरणानंतर नारायण राणेंच्या तब्येतीबाबत तसेच राजकीय भविष्याबाबत निर्माण झालेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Spread the love