March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

BMC निवडणूक रणधुमाळी | “ही गल्लीची आणि अस्मितेची लढाई आहे, फसव्या आश्वासनांना बळी पडू नका” – आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरच्या शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा. आदित्य ठाकरेंनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत मुंबईकरांना खोट्या आश्वासनांना बळी न पडण्याचं आवाहन केलं.

BMC Election Thackeray Brothers Rally | मुंबई :

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांची संयुक्त सभा दादर येथील शिवतीर्थावर पार पडली. या सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना उद्देशून स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ही निवडणूक कोणत्याही आमिषांची नाही, तर आपल्या अस्मितेची आणि आपल्या गल्लीची आहे. त्यामुळे खोट्या आश्वासनांच्या जाळ्यात अडकू नका.”

भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. भाजप सत्ताकाळात भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत ते म्हणाले, “भाजपने केवळ घोषणा आणि आश्वासने दिली. मात्र आम्ही सत्तेत असताना केलेली विकासकामे आजही मुंबईकरांच्या डोळ्यासमोर आहेत. जनताच कामाच्या जोरावर निर्णय घेईल.”

देवेंद्र फडणवीसांवर थेट सवाल

सभेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री करत टोला लगावला. घुसखोरीच्या मुद्द्यावरून त्यांनी सवाल उपस्थित केला की, “तुम्ही गृहमंत्री असताना इतक्या वर्षांत बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई का झाली नाही?”

“पाण्यावर कर लावला नाही, उलट ठेवी ठेवल्या”

आमच्या सत्ताकाळात पाण्यावर कोणताही कर लावण्यात आला नाही, असा दावा करत आदित्य ठाकरे म्हणाले, “महापालिकेच्या ९२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. आधी लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या, मग आमच्यावर आरोप करा.”
यावेळी त्यांनी शिवसेनेच्या कार्यकाळातील विविध विकास प्रकल्पांचीही माहिती दिली.

Spread the love