कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न लावून न दिल्याच्या रागातून ३५ वर्षीय मुलाने वडिलांची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

आजच्या काळात उशिरा होणारी लग्नं ही एक सामाजिक समस्या बनत चालली आहे. अशा परिस्थितीत पालकांकडून होणारी दुर्लक्षाची भावना काही वेळा गंभीर परिणाम घडवू शकते, याचं भयावह उदाहरण कर्नाटकमधून समोर आलं आहे.
चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्गा परिसरात बुधवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. वडिलांनी आपलं लग्न लावून देण्यासाठी कोणतीही पावलं उचलली नाहीत, या नाराजीतून मुलाने वडिलांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाला.
या प्रकरणातील आरोपीची ओळख एस. निंगराजा (वय ३५) अशी झाली असून तो पेशाने शेतकरी आहे. तर मृत वडिलांचे नाव टी. सन्ननिंगप्पा असे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निंगराजा याने लोखंडी रॉडने वडिलांवर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत सन्ननिंगप्पा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी निंगराजा हा दीर्घकाळापासून अविवाहित होता. गावातील त्याच वयोगटातील अनेक तरुणांची लग्नं झाली असून काहींना मुलंबाळंही आहेत. वडिलांनी स्वतः दोन विवाह केले असतानाही आपल्या मुलाच्या लग्नाकडे दुर्लक्ष केल्याने निंगराजा मानसिक तणावात होता. याच रागाच्या भरात त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं तपासात समोर आलं आहे.
घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

More Stories
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…
प्रल्हाद जोशी यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला…
पुणे: MPDA कायद्यांतर्गत स्थानबद्ध असलेला आरोपी मुंढवा पोलिसांच्या जाळ्यात; लपून वावरणाऱ्या पवन गायकवाडला अटक…