महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला निकाल. संपूर्ण वेळापत्रक व नियम जाणून घ्या.

मुंबई :
नगरपालिकांनंतर आता ग्रामीण महाराष्ट्रातील राजकारण तापणार असून राज्य निवडणूक आयोगाने आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता मतमोजणी केली जाणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
या पहिल्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.
📌 महत्त्वाच्या तारखा
- नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे: 16 ते 21 जानेवारी
- अर्ज छाननी: 22 जानेवारी
- अर्ज माघारीची अंतिम मुदत: 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत
- अंतिम उमेदवार यादी व चिन्हवाटप: 27 जानेवारी दुपारी 3.30 नंतर
- मतदान: 5 फेब्रुवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30
- मतमोजणी: 7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजल्यापासून
दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांहून अधिक असलेल्या जिल्हा परिषदांसाठी निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला 15 दिवसांची अतिरिक्त मुदत दिल्यामुळे 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
कुलाबा प्रकरणावर आयोगाची भूमिका
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा मतदारसंघातील अर्ज नाकारण्याच्या वादावर आयोगाने स्पष्टीकरण दिले. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून, अर्ज स्वीकारताना कायद्यानुसार प्रक्रिया झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याचे आयुक्तांनी सांगितले.
निवडणूक काळातील कारवाई
निवडणूक काळात आतापर्यंत 7 कोटी रुपयांची रोकड, 5 कोटींपेक्षा अधिक मद्यसाठा आणि 95 शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. राज्यभरात 3,796 मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली असून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
प्रचारावर निर्बंध
मतदानाच्या 48 तास आधी जाहीर प्रचारावर बंदी राहणार आहे. मात्र उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्यास परवानगी असून, या काळात माईक किंवा ध्वनीवर्धकाचा वापर करता येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले.
महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता ग्रामीण महाराष्ट्रात राजकीय रणधुमाळी रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

More Stories
शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे क्रीडा शिक्षकाला घरात घुसून मारहाण; विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत केली कारवाईची मागणी…
आळेफाटा येथे पिकअप आणि बोलेरो यांच्यात भीषण अपघात; एक ठार, नऊ जखमी
बारावी विज्ञान शाखेचा फिजिक्स-केमिस्ट्री पेपर फुटला; नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल