March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

“मनावर दुःखाचा डोंगर, पण दादांच्या विचारांवरच पुढे चालणार” – शपथ घेताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भावनिक प्रतिक्रिया….

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली भावनिक प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित पवार यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

मुंबई |

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आज राजकीय इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केली. “दादांच्या जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे, पण त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा आणि संघर्षाची शिकवण हाच माझा खरा आधार आहे,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अजित पवार यांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी काम करण्याचा मंत्र दिला. ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प मी आज या जबाबदारीच्या माध्यमातून घेत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्या पुढे म्हणाल्या, दादांच्या अकाली जाण्याने केवळ कुटुंबालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर शोककळा पसरली आहे. मात्र, त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणे, हाच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

शासनाच्या कामकाजाबाबत भूमिका स्पष्ट करताना सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांसाठी संधी, महिलांचे सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणे हे सर्वोच्च प्राधान्य असेल. शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेला बळ देत, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडू, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन, असा निर्धार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

Spread the love