May 8, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

नसरापूर प्रकरण : “जिथे चिमुरडीवर अत्याचार झाला, तिथेच ‘त्याला ठेचून मारा’ – आरोपीच्या पत्नीचा संतप्त उद्रेक”

भोर, पुणे | प्रतिनिधी : विशाल शिंदे (नसरापूर)

भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याच्या संतापजनक घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत असताना, या प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांनी प्रथमच माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली आहे.

प्रभात वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आरोपीची पत्नी आणि मुलगा यांनी अत्यंत भावनिक आणि संतप्त प्रतिक्रिया देत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलन आणि संतापाच्या पार्श्वभूमीवर आरोपीच्या कुटुंबीयांनी प्रभात पत्रकारांशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली व प्रथमच प्रभात माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी आरोपीच्या पत्नीने घटनास्थळाचा उल्लेख करत, “ज्या ठिकाणी त्या चिमुरडीवर अत्याचार झाला, त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. बोलताना त्या वारंवार अश्रू अनावर होत असल्याचे दिसून आले.

त्या पुढे म्हणाल्या, “मला अकरा नातवंडं आहेत. ही घटना घडल्यापासून मी अन्न-पाणी घेतलेलं नाही. त्या चिमुरडीच्या आत्म्याला काय वाटलं असेल, तिच्या आई-वडिलांवर काय बीतत असेल याचा विचार करून अंग शहारतं. मीही एक आई आहे… ही वेदना सहन होत नाही.”

आरोपीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “गेल्या दहा वर्षांपासून त्याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही. तो घरी राहत नव्हता. आम्ही आई-मुलगा वेगळेच राहत होतो. अनेक वेळा त्याला घरी बोलावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कधीच प्रतिसाद दिला नाही.”

आरोपीवर यापूर्वीही अत्याचाराचे आरोप झाले असल्याची कबुली देत त्यांनी सांगितले की, “माझ्या पोटात हा मुलगा असताना ६५ वर्षांच्या महिलेवर त्याने अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्या आधीच्या काही गोष्टी मला माहिती आहेत आणि त्या मी मान्यही करते.”

तथापि, गावकऱ्यांकडून करण्यात आलेल्या काही गंभीर आरोपांचे त्यांनी खंडन केले. “माझ्या मुलींवर त्याने अत्याचार केले, हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. मला सात मुली आहेत. जर असं काही घडलं असतं, तर मी स्वतः तक्रार केली असती. कुठलीही आई हे सहन करणार नाही. आमची बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे,” असे त्या ठामपणे म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, “तो बाहेर काय करायचा याची मला माहिती नाही. पण घरात त्याने माझ्या मुलींशी गैरवर्तन केलं नव्हतं. गावात ज्या चर्चा सुरू आहेत त्या चुकीच्या आहेत.”

आरोपीच्या सुटकेबाबत त्यांनी सांगितले की, “जमीन विक्रीच्या कारणावरून त्याच्या मोठ्या भावाने पैसे देऊन त्याला तुरुंगातून बाहेर काढले होते.”

दरम्यान, आरोपीच्या मुलानेही अत्यंत तीव्र शब्दांत वडिलांच्या कृत्याचा निषेध केला. “तो माझा बाप आहे, हीच माझी सर्वात मोठी चूक आहे. त्याने केलेल्या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो. सरकारने त्याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी,” अशी मागणी त्याने केली.

तो पुढे म्हणाला, “मी त्याचा मुलगा आहे हे माझं दुर्दैव आहे. त्या चिमुरडीला ज्या वेदना झाल्या, त्या यालाही झाल्या पाहिजेत. त्याला लोकांच्या हवाली करून ठेचून मारलं पाहिजे.”

भूतकाळातील घटनांचा उल्लेख करत त्याने सांगितले की, “त्याने स्वतःच्या पुतणीवर अत्याचार केला तेव्हा मी नववीत होतो. तेव्हा आम्हाला घरदार सोडून जावं लागलं. त्यानंतर मी त्याच्याशी सर्व संबंध तोडले. मला बाप म्हणजे काय हेच माहीत नाही.”

तो पुढे म्हणाला, “आज आमच्या कुटुंबात सात बहिणी आणि आई आहे. आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? मात्र, त्याने केलेल्या गुन्ह्याचा दोष आमच्या कुटुंबावर देणं चुकीचं आहे.”

शेवटी त्याने भावनिक आवाहन करत म्हटले, “त्या चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळावा. इतक्या क्रूरतेने तिची हत्या करण्यात आली… अशा व्यक्तीला माझा बाप म्हणावंसंही वाटत नाही.”

दरम्यान, या प्रकरणामुळे नसरापूरसह संपूर्ण भोर तालुक्यात संतापाचे वातावरण असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी नागरिकांकडून आंदोलन, मोर्चे आणि बंदचे आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनाकडूनही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास जलदगतीने सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Spread the love