September 13, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

​पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी! यवतमध्ये ३ गावठी पिस्तुल आणि १५ जिवंत काडतुसांसह तिघांना अटक; बलेनो कारसह ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत….

पुणे, येवत (प्रतिनिधी: प्रीतम सावंत): अवैध शस्त्रास्त्रांविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि यवत पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्त कारवाई करत दौंड तालुक्यातील भांडगाव गावच्या हद्दीत तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ अवैध गावठी पिस्तुल, १५ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली एक पांढऱ्या रंगाची बलेनो कार असा एकूण ५,३७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोपनीय बातमीदाराने दिली माहिती

​कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या आणि गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ७ जुलै २०२६ रोजी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते.

​या दरम्यान, भांडगाव परिसरातील सोनाक्षी मंगल कार्यालयासमोर एक विना नंबरची पांढऱ्या रंगाची बलेनो कार संशयास्पदरित्या फिरत असून, त्यात असलेल्या तीन इसमांकडे अवैध गावठी पिस्तुल असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली.

सापळा रचून आवळल्या मुसक्या

​माहिती मिळताच पोलिसांच्या संयुक्त पथकाने सोनाक्षी मंगल कार्यालयासमोर सापळा लावला. संशयास्पद बलेनो कार येताच पोलिसांनी ती शिताफीने थांबवून कारमधील तिघांची चौकशी केली. त्यांची कायदेशीर अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे प्रत्येकी १ याप्रमाणे ३ गावठी पिस्तुल आणि १५ जिवंत काडतुसे आढळून आली.

अटक करण्यात आलेले आरोपी:

​१) मंगेश शंकर मासोळे (वय २४ वर्षे)

२) सुरज संजय शेलार (वय २६ वर्षे)

३) रोहित प्रेमदास भुजवणे (वय २४ वर्षे) (सर्व रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे)

पुढील तपास सुरू

​या तिन्ही आरोपींना यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा र.नं. ६९२/२०२६, भारतीय हत्यार कायदा (आर्म्स अ‍ॅक्ट) कलम ३, ७, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी सदर पिस्तुल कोठून आणणार होते आणि त्यांचा नेमका काय हेतू होता, याचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपींना न्यायालयात हजर केले जात आहे.

कारवाई करणारे पथक:

​सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस (दौंड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

​या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, यवतचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोसई महेश डोंगरे, तसेच पोलीस अंमलदार सचिन घाडगे, आसिफ शेख, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीण, विकास पाटील, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, योगेश नागरगोजे, विकास कापरे, संदीप देवकर, धीरज जाधव आणि मोहन भानवसे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 

Spread the love

You may have missed