July 29, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुणे: धक्कादायक! वृद्ध माता-पित्यांच्या देखभालीसाठी ठेवलेल्या महिला केअरटेकरनेच मारला २.७० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; चंदननगर पोलिसांकडून ठाण्यातून अटक…

पुणे: घरातील वृद्ध माता-पित्याची काळजी घेण्यासाठी विश्वासाने कामावर ठेवलेल्या एका महिला केअरटेकरनेच घरातील २ लाख ७० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पुणे शहराच्या चंदननगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अत्यंत चाणाक्षपणे तपास करत, आरोपी महिलेला ठाणे येथून अटक केली असून तिच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.

​स्वाती विजय मोरे (वय ३७ वर्षे, रा. लोढा क्राऊन व्हीवा, माजीवाडा, ठाणे पश्चिम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिला केअरटेकरचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगावशेरी येथील ‘कृष्णाई बंगलो’ (साईनाथ हाऊसिंग सोसायटी) मध्ये राहणाऱ्या फिर्यादी यांनी त्यांच्या वयोवृद्ध आई-वडिलांची देखभाल करण्यासाठी आरोपी स्वाती मोरे हिला कामावर ठेवले होते. १३ जून २०२६ रोजी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास, आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या आईचे अंदाजे ४ तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या (बांगड्या) आणि ५ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले (कानटोपे) असा एकूण २,७०,००० रुपयांचा ऐवज लबाडीच्या इराद्याने चोरून नेला आणि ती फरार झाली.

​घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी २८ जून २०२६ रोजी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर २९४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी असा लावला छडा

​गुन्हा दाखल झाला तेव्हा आरोपी महिलेचे संपूर्ण नाव आणि पत्ता पोलिसांकडे उपलब्ध नव्हता. चंदननगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी या गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) केले. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी महिलेची संपूर्ण माहिती मिळवली. ती ठाण्यात असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी २ जुलै २०२६ रोजी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तिला ताब्यात घेतले.

संपूर्ण मुद्देमाल जप्त

​पोलिसांनी आरोपी स्वाती मोरे हिची सखोल चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात चोरीला गेलेले:

  • २,४०,०००/- रुपये किमतीच्या ३८.२०० ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या बांगड्या
  • ३०,०००/- रुपये किमतीची ५.२०० ग्रॅम वजनाची २ सोन्याची कर्णफुले

​असा एकूण २,७०,०००/- रुपये किमतीचा १०० टक्के मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे करत आहेत.

तपास पथकाची कामगिरी:

सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-७) श्री. अबिनाश कुमार, आणि सहायक पोलीस आयुक्त (खराडी विभाग) श्री. सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमोल धस यांच्या सूचनेनुसार, सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार मेमाणे, घावटे, घुटे, लहाणे, पाटील, बेंद्रे, गायकवाड आणि महिला पोलीस अंमलदार बायसकर यांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली.

Spread the love