September 13, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई; १.२४ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य माल जप्त, एकाला अटक…

पुणे | प्रतिनिधी

काळेपडळ पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधी गुटखा, पानमसाला, सुपारी व तंबाखूजन्य पदार्थांची अवैधरित्या साठवणूक व विक्री करणाऱ्या रॅकेटवर कारवाई करत एक आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत एकूण १ लाख २४ हजार ४२० रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे पोलिस कर्मचारी अमोल फडतरे व महादेव शिंदे यांनी कंजारभट वस्ती, ढेरे कंपनीजवळ, काळेपडळ परिसरात सापळा रचला. यावेळी शेराराम कानाराम देवासी (वय २४, रा. संकेत विहार, गल्ली क्रमांक ७, काळेपडळ, हडपसर) याला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी नेत असताना ताब्यात घेण्यात आले.

आरोपीची चौकशी केली असता त्याने परिसरातील एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित माल साठवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार केतकेश्वर कॉलनी, गल्ली क्रमांक १५, काळेपडळ येथील बंद खोलीवर छापा टाकण्यात आला. तेथून १ लाख ९ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आला. यापूर्वी आरोपीकडून १५ हजार ४२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता.

या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलिसांच्या तपास पथकाने केली.

Spread the love

You may have missed