September 12, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुणे : गुन्हेगारी टोळीच्या मुसक्या आवळल्या; देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे व कारसह ६.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त…

पुणे, दि. २९ जून : लोणीकंद पोलिसांनी गुन्हे प्रतिबंधक नाकाबंदी दरम्यान धाडसी कारवाई करत एका गुन्हेगारी टोळीतील तीन जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि ग्लांझा कार असा एकूण ६ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक नाकाबंदी सुरू होती. त्यावेळी वाघोलीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या काळ्या फिल्म लावलेल्या पांढऱ्या ग्लांझा कारला थांबविण्याचा इशारा देण्यात आला. मात्र चालकाने वाहन न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून कार अडवली. 

तपासणीदरम्यान कारमध्ये रोहन ऋषिकेश गायकवाड (२२), अभिषेक भानुदास लंघे (२५) आणि विशाल उद्धव झाडगे (२२) हे तिघे आढळून आले. हे तिघेही गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. 

झडतीमध्ये आरोपींकडून ३० हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल, ६ हजार रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे तसेच ६ लाख रुपये किमतीची टोयोटा ग्लांझा कार असा एकूण ६ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७०/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपींविरुद्ध आर्म्स ॲक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कागणे करीत आहेत.

Spread the love

You may have missed