
पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने एक मोठी कामगिरी केली आहे. वानवडी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गंभीर ‘मोक्का’ (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. यासोबतच, तो फरार असल्याचे माहीत असतानाही त्याला आपल्या घरात आश्रय देणाऱ्या त्याच्या एका साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे.
रोहित भारत गायकवाड (वय २५ वर्षे, रा. गोसावी वस्ती, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य फरार आरोपीचे नाव आहे. तर त्याला आश्रय देणाऱ्या ऋतिक उर्फ काल्या रणजित रावळकर (वय २६ वर्षे, रा. कन्डवस्ती, वाघळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बारामतीमध्ये लपला होता आरोपी
पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पथक शहरातील फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत होते. यादरम्यान, वानवडी पोलीस ठाण्यातील गु.रं.नं. ५२६/२०२५ मधील मोक्का कायद्यांतर्गत पाहिजे असलेला आरोपी रोहित गायकवाड हा बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील कन्डवस्ती येथे लपून बसल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाला मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांच्या टीमने तातडीने वाघळवाडी येथे जाऊन सापळा रचला. तिथे तपास केला असता, आरोपी रोहित गायकवाड हा ऋतिक उर्फ काल्या रावळकर याच्या राहत्या घरी मिळून आला. रोहित हा एका गंभीर गुन्ह्यात फरार आरोपी आहे हे माहीत असतानाही ऋतिकने त्याला आश्रय दिला होता. पोलिसांनी दोघांनाही अटक करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी वानवडी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कामगिरी
सदरची धडक कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलीस निरीक्षक श्री. संदीपान पवार, पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण यांच्या सूचनेनुसार पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार राहुल ढमढेरे, अविनाश इंगळे, शहाजी काळे, अमर चव्हाण, परमेश्वर कदम, शशिकांत नाळे, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, अकबर शेख, सुधीर सोनवणे, स्वाती तुपे, जयदेव भोसले, नेत्रिका अडसुळ, नासेर देशमुख आणि महिला पोलीस अंमलदार मयुरी पालवे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली आहे.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…