
पुणे, लोणी काळभोर (प्रतिनिधी: प्रीतम सावंत) : कदमवाकवस्ती येथील दोन वर्षीय सोहम लखन कसबे याचा पावसाचे व सांडपाणी साचलेल्या खुल्या चारीत पडून मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सुरक्षा उपाययोजनांच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर परिसरात पावसाचे व सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी काही दिवसांपूर्वी चर खोदण्यात आला होता. मात्र खोदकामानंतर त्या ठिकाणी कोणतेही संरक्षक कठडे, इशारा फलक किंवा अन्य सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी पावसाचे व सांडपाणी साचून हा चर धोकादायक बनला होता.
३० जून रोजी सकाळी घरासमोर खेळत असताना सोहम अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी परिसरात शोध घेत असताना चरीजवळ त्याच्या चप्पला आढळून आल्या. त्यानंतर नातेवाईकांनी पाण्यात शोध घेतला असता तो बेशुद्ध अवस्थेत सापडला. तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले.
या प्रकरणी सोहमची आई शिल्पा कसबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीत संबंधित ठेकेदाराने खोदलेल्या चारीभोवती आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याने आणि साचलेल्या पाण्याचा निचरा न केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत केवळ ठेकेदारावरच नव्हे तर संबंधित कामाची देखरेख करणाऱ्या यंत्रणेच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सार्वजनिक कामांदरम्यान सुरक्षेच्या नियमांचे पालन न झाल्यास अशा दुर्घटना घडू शकतात, त्यामुळे संबंधित यंत्रणांनी अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

More Stories
पुण्यात खळबळ! विक्रीसाठी आणलेली ४ गावठी पिस्टल जप्त; खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई, एक जण जेरबंद…
पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: दौंड तालुक्यातील खुटबाव येथे दरोड्याच्या तयारीत असलेले आंतरजिल्हा दरोडेखोर जेरबंद…
दौंड तालुक्यातील दापोडी येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूवर पोलिसांची कारवाई; एकावर गुन्हा दाखल…