July 29, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुण्यात हॉटेल बंद केल्याचा राग! सिंहगड कॉलेज परिसरात तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; एकाला अटक, ३ अल्पवयीन ताब्यात…

पुणे: पुण्यातील सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरात हॉटेल बंद केल्याचा राग मनात धरून एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणाचा वेगाने तपास करत पुणे शहर पोलिसांच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनने मुख्य आरोपीला अटक केली असून, त्याच्यासोबत असलेल्या ३ विधिसंघर्षग्रस्त (अल्पवयीन) बालकांना ताब्यात घेतले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

​१ जुलै २०२६ रोजी रात्री ३:०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज कॅम्पस, लॉ कॉलेज रोडवरून आपल्या घरी जात होते. त्याच वेळी दोन दुचाकींवरून आलेल्या काही मुलांनी हॉटेल बंद केल्याचा राग मनात धरून फिर्यादी यांना रस्त्यात अडवले. त्यांना अश्लील शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर टोळक्याने धारदार हत्याराने फिर्यादीच्या डोक्यात, हातावर आणि दोन्ही पायांवर सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

​याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३५८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११८(२), ३५२, ३(५) सह आर्म अ‍ॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास पथकाला मिळाले यश

​दाखल गुन्ह्यातील आरोपी अनोळखी असल्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार शोध घेत होते.

​तपास सुरू असताना पोलीस अंमलदार तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश गायकवाड आणि किरण साबळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, हा गुन्हा सागर सोमनाथ वाघमारे आणि त्याच्या ३ अल्पवयीन साथीदारांनी मिळून केला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपी सागर वाघमारे (वय १९ वर्षे, रा. गंगानगर, हडपसर, पुणे) याला अटक केली आणि इतर ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

कारवाई करणारे पोलीस पथक

​सदरची धडक कामगिरी पुणे शहर पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे (भारती विद्यापीठ विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.

​या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, युद्धजित भोसले, तसेच पोलीस अंमलदार तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, प्रदीप चव्हाण, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे आणि सोहम शेंडकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 

Spread the love