
मुंबई: राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढलेली अन्नातील भेसळ आणि बनावट औषधांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तंत्रज्ञानाचा वापर करत मोठी मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ आणि पारदर्शक पद्धतीने कारवाई व्हावी, यासाठी एक नवीन AI-सक्षम तक्रार निवारण पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे. complaints.mahafda.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नागरिक आता आपल्या तक्रारी नोंदवू शकतात.

‘फक्त बोला आणि तक्रार नोंदवा’ (Just Speak) वैशिष्ट्य
या पोर्टलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याची सुलभता. अनेकदा लोकांना ऑनलाईन फॉर्म भरणे किंवा टायपिंग करणे अवघड जाते. ही अडचण दूर करण्यासाठी या पोर्टलमध्ये ‘जस्ट स्पीक’ (Just Speak) हे फिचर देण्यात आले आहे.
नागरिक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी यांपैकी कोणत्याही भाषेत फक्त बोलून आपली समस्या सांगू शकतात. त्यानंतर हे AI तंत्रज्ञान त्या आवाजाचे अत्यंत स्पष्ट, सविस्तर आणि कायदेशीर मसुद्यात रूपांतर करून ती तक्रार ऑटोमॅटिक सिस्टीममध्ये सबमिट करेल.
कशी होणार कारवाई? (पोर्टलची महत्त्वाची वैशिष्ट्ये):
- ऑटो-असाइनमेंट (Auto-Assignment): नोंदवलेली तक्रार कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय थेट संबंधित भागाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्याकडे (Food Safety Officer) वर्ग केली जाईल.
- ऑटो-एस्केलेशन (Auto-Escalation): जर संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या ठराविक वेळेत त्या तक्रारीवर कारवाई केली नाही, तर ती तक्रार आपोआप वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल. त्यामुळे अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होईल.
- ऑनलाईन ट्रॅकिंग (Online Tracking): तक्रारदाराला केवळ एका क्लिकवर आपली तक्रार सबमिट करता येईल आणि त्यानंतर प्रशासनाने त्यावर काय कारवाई केली, याचा मागोवा (Traceability) देखील ऑनलाईन घेता येईल.
मुंढेंचा भेसळखोरांवर धडक धडाका
तुकाराम मुंढे यांनी एफडीए आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून राज्यात भेसळयुक्त दूध, बनावट औषधे, अवैध गुटखा आणि अस्वच्छ हॉटेल्सविरुद्ध तीव्र मोहीम उघडली आहे. केवळ एका महिन्यात शेकडो ठिकाणी धाडी टाकून कोट्यवधी रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. नागरिकांनीही आपल्या परिसरात असा काही गैरप्रकार आढळल्यास या नवीन पोर्टलचा वापर करून जागरूक नागरिक म्हणून तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

More Stories
एसटी बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर राज्यभरात धडक कारवाई; ८ हजार वाहनांवर कारवाई, १ कोटी ६५ लाखांचा दंड वसूल…
वाडी येथील अमरावती रोड उड्डाणपुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज सेतू’ नाव देण्याची मागणी; शिवसेना शिंदे गटाचे नगर परिषदेला निवेदन…
मुंबई कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारला आग; धुराचे लोट, वाहतूक विस्कळीत…