
पुणे (क्राईम प्रतिनिधी): विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणि ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई झालेल्या गुन्ह्यात तब्बल एका वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला लोहगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. धानोरी येथील जकात नाका परिसरात सापळा रचून पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
प्रणव भागवत शिंदे (वय १९ वर्षे, रा. चौधरीनगर लेन नं. १०, शिवशक्ती मित्रमंडळाजवळ, मुंजाबा वस्ती, धानोरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै २०२६ रोजी लोहगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार जंगम हे हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक गस्त घालत होते. यावेळी त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील (गु.र.नं. ४०४/२०२५) आणि मोक्का कारवाईतील पाहिजे असलेला आरोपी प्रणव शिंदे हा धानोरी येथील जकात नाक्याजवळ एका नाल्याशेजारी उभा आहे.
या माहितीची तत्काळ दखल घेत, लोहगाव पोलिसांच्या तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी जकात नाका परिसरात सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास सापळा रचला. पोलिसांनी अतिशय शिताफीने कारवाई करत आरोपी प्रणव शिंदे याला ताब्यात घेतले. आरोपीवर भारतीय न्याय संहिता, आर्म्स ॲक्ट (शस्त्र कायदा), महाराष्ट्र पोलीस कायदा आणि मोक्का कायद्याच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. त्याला पुढील तपासासाठी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हजर करण्यात आले आहे.
यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:
सदरची धडक कारवाई पुर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार, लोणीकंद विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे, लोहगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) राकेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे, तसेच पोलीस अंमलदार अमित गायकवाड, अमोल आदलिंग, प्रीतम जंगम, अल्पेश पोटकुले, दादासाहेब बर्डे, ज्योतीराम देवकाते, बाळासाहेब शिरसाठ, ज्ञानदेव आवारी, मोहन पालवे, शैलेश कुदळे, बबलू भिसे व दिनेश रसाळ यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…