July 30, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

भाविकांसाठी महत्त्वाची बातमी: प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामदरा मंदिर १ सप्टेंबरपर्यंत दर्शनासाठी बंद…

लोणी काळभोर, पुणे (संपादक: शंकर जैनजांगडे): पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय मंदिर भाविकांसाठी आगामी १ सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. मंदिराच्या गर्भगृहासह मंदिर परिसरात सध्या दुरुस्ती आणि डागडुजीची मोठी कामे सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कामाच्या प्रगतीनुसार मंदिर बंद राहण्याचा हा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय ट्रस्टचे अध्यक्ष १००८ श्री महंत हेमंतपुरी महाराज यांनी दिली.

काम अपूर्ण राहिल्याने मुदतवाढ

​मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या गर्भगृहासह परिसरातील विविध आवश्यक दुरुस्तीच्या कामांसाठी सुरुवातीला १८ जून ते १८ जुलै या कालावधीत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, नियोजित मुदतीत हे काम पूर्ण होऊ शकले नाही. उर्वरित कामे दर्जेदार पद्धतीने आणि सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी आता मंदिर बंद ठेवण्याच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.

सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रवेश बंद

​सध्या मंदिराच्या गर्भगृहात आणि इतर संवेदनशील भागांमध्ये बांधकामाचे काम वेगाने सुरू आहे. अशा परिस्थितीत मंदिरात गर्दी झाल्यास भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हीच बाब लक्षात घेऊन प्रशासनाने मंदिर परिसरात प्रवेश पूर्णपणे नाकारला आहे.

महत्त्वाची सूचना: १ सप्टेंबरपर्यंतच्या या कालावधीत मंदिरात प्रवेश, नियमित दर्शन, वैयक्तिक पूजा-अर्चा तसेच इतर कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांना भाविकांसाठी पूर्णपणे बंदी असेल. त्यामुळे भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Spread the love