July 29, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

​पुण्यात खळबळ! फुरसुंगीत ‘टाटा सॉल्ट’च्या बनावट मिठाची विक्री; गोदामावर छापा टाकून माल जप्त…

पुणे: पुण्यातील फुरसुंगी-हडपसर रस्त्यावरील एका गोदामावर पोलिसांनी आणि मुंबईच्या कॉपीराईट तपासणी पथकाने संयुक्त कारवाई करत एक मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या छाप्यात नामांकित ‘टाटा सॉल्ट’ (Tata Salt) कंपनीचे बनावट आणि बेकायदेशीरपणे तयार केलेले शेकडो मिठाचे पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी गोदामाच्या मालकाविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि कॉपीराईट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या ‘ई. आय. पी. आर. इंडिया प्रा. लि.’ (कफ परेड, मुंबई) या कॉपीराईट आणि स्वामित्वाचे हक्क जपणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना फुरसुंगी परिसरात बनावट टाटा सॉल्टची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कंपनीचे तपास अधिकारी कृष्णा देवीप्रसाद कनोजीया यांनी पुणे शहर पोलीस उपआयुक्तांच्या (परिमंडळ ६) लेखी परवानगीने फुरसुंगी पोलिसांची मदत मागितली.

​त्यानुसार, मंगळवारी (१४ जुलै) दुपारी दोन पंचांच्या उपस्थितीत फुरसुंगी येथील खुटवड चौकात असलेल्या ‘आरंभ डिस्ट्रीब्युटर’ या गोदामावर धाड टाकण्यात आली. कारवाईच्या वेळी गोदामाचे मालक धवल जैन (वय ६०, रा. मार्केटयार्ड, पुणे) तेथे हजर नव्हते. पोलिसांनी तेथील कामगाराकडे टाटा मिठाच्या पाकिटांची मागणी केली. या पाकिटांची बारकाईने पाहणी केली असता, त्यावर असलेली छपाई, रंगसंगती आणि पॅकिंगची सुबकता यामध्ये मूळ कंपनीच्या तुलनेत मोठी विसंगती आढळून आली.

​गोदामाची झडती घेतली असता पोलिसांना टाटा सॉल्टचे हुबेहूब नाव वापरलेल्या ५ गोण्या आढळल्या. या गोण्यांमध्ये १ किलो वजनाचे एकूण १४८ बनावट पाकिटे मिळून आली. जप्त करण्यात आलेल्या या बनावट मालाची एकूण किंमत ४,७३६ रुपये इतकी आहे. बाजारात टाटा सॉल्टच्या एका पाकिटाची किंमत ३२ रुपये आहे.

​पोलिसांनी यातील दोन पाकिटे नमुना (सँपल) म्हणून रासायनिक तपासणीसाठी ताब्यात घेतली असून उर्वरित सर्व बनावट माल सीलबंद केला आहे. या प्रकरणी कृष्णा कनोजीया यांनी दिलेल्या तक्रारीवरून ‘आरंभ डिस्ट्रीब्युटर’चे मालक धवल जैन यांच्याविरुद्ध कॉपीराईट अ‍ॅक्ट आणि फसवणुकीच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुरसुंगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Spread the love