
पुणे: कर्वे रस्ता, कोथरूड येथील एका मोबाईल व्यावसायिकावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या टोळीचा पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक १ ने अवघ्या २४ तासांच्या आत पर्दाफाश केला आहे. व्यावसायिक अंतर्गत वादातून या व्यावसायिकाच्या खुनाची सुपारी (Contract Killing) देण्यात आल्याचे तपासात उघड झाले असून, पोलिसांनी मुख्य सूत्रधारांसह एकूण ८ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
घोरपडे उद्यानात रचला सापळा
ही घटना १४ जुलै २०२६ रोजी कोथरूडमधील कर्वे रोड परिसरामध्ये घडली होती. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास खंडणी विरोधी पथक १ चे सपोनि प्रसन्न जऱ्हाड आणि त्यांचे पथक करत होते.
तपास सुरू असतानाच, पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे आणि रहिम शेख यांना गोपनीय माहिती मिळाली की, या हल्ल्यातील प्रमुख आरोपी सिद्धेश धुमाळ हा घोरपडे उद्यान परिसरात लपून बसला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घोरपडे उद्यान परिसरात सापळा लावला आणि सिद्धेश नितीन धुमाळ (वय २५, रा. घोरपडे पेठ, पुणे) याला ताब्यात घेतले.
तपासात उघड झाला ‘सुपारी’चा कट
धुमाळ याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने या गुन्ह्यातील त्याचे इतर साथीदार नागेश उर्फ लाडू राजू मानिके (वय १९, रा. विश्रांतवाडी), राज तुषार धुमाळ (वय १९, रा. एरंडवणे) आणि दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांची (नाबालिग) नावे सांगितली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या सर्वांना ताब्यात घेतले.
पुढील तपासात या हल्ल्यामागील सर्वात धक्कादायक माहिती समोर आली. फिर्यादी व्यावसायिकाशी असलेल्या अंतर्गत वादामुळे काही जणांनी त्याच्या खुनाची सुपारी दिली होती. यामध्ये:
१) प्रसाद सुभाष मारणे (वय ३१, रा. कोथरूड)
२) आदित्य अश्विनीकुमार डाके (वय २८, रा. कोथरूड)
३) मेघराज ज्ञानेश्वर वारंगळे (वय ३५, रा. नऱ्हे, पुणे)
या तिघांनी मिळून हा कट रचला आणि व्यावसायिकाला संपवण्यासाठी ही सुपारी दिली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या तिन्ही मुख्य सूत्रधारांनाही बेड्या ठोकल्या आहेत.
अंतर्गत वादातून खुनाचा प्रयत्न: व्यावसायिकावर भररस्त्यात लोखंडी कोयत्याने हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे २४ तासांच्या आत या संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला.
या पथकाने केली कामगिरी
सदरची धडक कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री. संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्विनी सातपुते, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, आणि सहायक पोलीस आयुक्त १ (गुन्हे शाखा) श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत खंडणी विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक महेश सागडे, युनिट ३ चे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सपोनि प्रसन्न जऱ्हाड, सपोनि नानासाहेब कदम तसेच पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण, दुर्योधन गुरव, रहिम शेख, सोमनाथ कांबळे, बाबासाहेब दांगडे, दयानंद तेलंगे पाटील, सचिन माळवे, नितीन कांबळे, मयुर मोकरे, किरण मोरे, नितीन बोराटे, सुहास जगताप, मुकुंद तारू, अतुल साठे, हानीफ शेख, अमित बोरडे, किशोर शिंदे आणि पुरुषोत्तम गुनला यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…