
पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परिमंडळ-७ चे पोलीस उपायुक्त (DCP) श्री. अविनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली परिसरात ‘मिशन क्रॅकडाऊन’ (Mission Crackdown) ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. संघटित गुन्हेगारी, अवैध धंदे आणि समाजविघातक कृत्यांचे कंबरडे मोडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत लोहगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ जुलै २०२६ रोजी एकापाठोपाठ एक धडक कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेसाठी परिमंडळ-७ मध्ये दोन विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
लोहगावमधील धडक कारवायांचा सविस्तर तपशील
पहिली धडक कारवाई मोजे आळी, लोहगाव येथील ‘हॉटेल ब्ल्यू डायमंड’ वर दुपारी १२:१५ वाजता करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी हॉटेलचालक हनुमंता शिवलिंगप्पा शिंदे (वय २२ वर्षे) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ७,९९० रुपये किमतीचा बेकायदेशीर देशी-विदेशी मद्यसाठा आणि २,००० रुपयांची रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणात हॉटेलचे मूळ मालक सुरज गायकवाड यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतर दुसरी कारवाई दुपारी १:०० वाजता लोहगाव येथीलच ‘हॉटेल राजरत्न’ वर करण्यात आली. येथे कारवाईदरम्यान पोलीस पथकाने चालक संकेत भारत घोडके (वय २८ वर्षे) याच्याकडून ४,००५ रुपये किमतीचा देशी-विदेशी मद्यसाठा आणि ११,५३० रुपयांची रोकड हस्तगत केली. या प्रकरणात हॉटेलचे मूळ मालक सुहारा प्रवीण मोडक यांच्यासह गुन्हा दाखल करून आरोपी करण्यात आले आहे.
तिसरी मोठी कारवाई दुपारी २:०० वाजता ‘यशस्वी हॉटेल’च्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमधील मटका अड्ड्यावर करण्यात आली. या धाडीत भाऊसाहेब गोपीनाथ रागफ्सरे यांच्यासह तीन मटका रायटर रंगेहाथ मटका लिहिताना आढळून आले. पोलिसांनी या मटका अड्ड्यावरून कल्याण व मुंबई टाईम बाजारचे मटका साहित्य, एकूण १९ पावती पुस्तके (८ वापरलेली आणि ११ न वापरलेली), २ मोबाईल फोन आणि १०,८९० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
कायदेशीर कारवाई आणि पोलीस पथक
या सलग कारवायांमध्ये एकूण ६ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये २ गुन्हे आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अन्वये १ गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) श्री. गोरक्षनाथ कराड, पोलीस उपनिरीक्षक (PSI) श्री. नितीन राठोड, पोलीस हवालदार बेंद्रे, साबळे, इथापे, तसेच पोलीस शिपाई पुंडे, चिनके आणि सरतापे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास लोहगाव पोलीस करत आहेत.
नागरिकांना पोलीस प्रशासनाचे आवाहन
परिमंडळ-७ च्या हद्दीत कुठेही अवैध दारू विक्री, मटका, जुगार, अमली पदार्थ (ड्रग्ज), बेकायदेशीर शस्त्रे, गुंडगिरी किंवा खंडणी वसुली सुरू असल्यास नागरिकांनी त्वरित खालील क्रमांकांवर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.
- श्री. अविनाश कुमार (IPS, DCP झोन ७): +91 8802007938
- इतर संपर्क क्रमांक: +91 99227 17999 / +91 99227 44599

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…