July 30, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुण्यात पोलिसांचे ‘मिशन क्रॅकडाऊन’; लोहगावात ५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा अन् कार जप्त, एकावर गुन्हा दाखल…

पुणे (सुनित जैनजांगडे):पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी सुरू असलेल्या ‘Zone 7: मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोहगाव परिसरातील वडगावशिंदे रोडवर पोलिसांनी छापा टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत गुटख्यासह एक मारुती स्विफ्ट कार असा एकूण ५ लाख १७ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

​या प्रकरणी सुनील संभाजी खांदवे (वय ४० वर्षे, रा. लेन नं. १, जनार्दन नगर, वडगावशिंदे रोड, लोहगाव, पुणे) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​गोपनीय माहितीच्या आधारे धाडसत्र

​पोलीस उपनिरीक्षक (PSI) राठोड यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक शनिवारी (१८ जुलै) सायंकाळी पेट्रोलिंगवर होते. यादरम्यान त्यांना वडगावशिंदे रोडवर बेकायदेशीर गुटख्याची साठावणूक आणि वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सायंकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास जनार्दन नगर येथे तात्काळ छापा टाकला.

​या छाप्यादरम्यान आरोपी सुनील खांदवे याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला, सुगंधी तंबाखू आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. हा माल बाजारात विक्री व वितरणासाठी आणण्यात आला होता. पोलिसांनी गुटख्यासह वाहतुकीसाठी वापरण्यात यारी मारुती स्विफ्ट कार (क्र. MH-12-SQ-2862) देखील जप्त केली आहे.

​विविध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल

​या गंभीर प्रकारानंतर आरोपीविरुद्ध केवळ पोलीस नियमांनुसारच नाही, तर अन्न सुरक्षा आणि तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत कठोर कलमे लावण्यात आली आहेत. आरोपीवर भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ सह सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम (COTPA), २००३ चे कलम ७(२), २०(३) आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ च्या कलम २६(१)(iv) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी व जप्त मुद्देमाल लोहगाव पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

​”पुणे शहर परिमंडळ ७ अंतर्गत प्रतिबंधित गुटखा, अमली पदार्थ, अवैध दारू, जुगार व इतर बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध ही मोहीम अशीच सुरू राहील आणि येत्या काळात अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील.”

— पोलीस प्रशासन, परिमंडळ-७, पुणे.

​नागरिकांना पोलिसांचे आवाहन: तुमची माहिती, आमची गुप्तता!

​परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त (DCP) अविनाश कुमार (IPS) यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात गुन्हेगारी टोळ्या, बेकायदेशीर गुटखा विक्री, ड्रग्ज किंवा इतर कोणत्याही अवैध कृत्यांची माहिती असल्यास ती खालील क्रमांकांवर त्वरित द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल.

  • ​श्री. अविनाश कुमार (IPS, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७): +91 88020 07938
  • ​API खराडे: +91 99227 17999
  • ​PSI राठोड: +91 99227 44599
Spread the love