
पुणे ( सुनित जैनजांगडे ): पुणे शहरातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठी कामगिरी केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे उंड्री परिसरात सापळा रचून एका विधीसंघर्षित बालकाला (अल्पवयीन मुलाला) ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे काळेपडळ आणि राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ५ गुन्हे उघडकीस आले असून, आरोपीकडून ४,५०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही आणि खबऱ्याच्या माहितीवरून सापळा
काळेपडळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९२/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२)) अंतर्गत दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे व त्यांची टीम करत होती.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत असताना पोलीस अंमलदार शाहिद शेख आणि अतुल पंधरकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून खबर मिळाली की, चोरी झालेली दुचाकी घेऊन एक जण उंड्री येथील हिलग्रीन शाळेसमोरील रस्त्यावर थांबला आहे. या माहितीच्या आधारे तपास पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सापळा रचला आणि संबंधित बालकाला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले.
तपासात उघड झाले ५ गुन्हे
ताब्यात घेतलेल्या बालकाकडे सखोल चौकशी केली असता, त्याने काळेपडळ व राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वेगवेगळ्या वेळी ३ दुचाकी, १ रिक्षा आणि १ मोबाईल हँडसेट चोरी केल्याची कबुली दिली.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
- काळेपडळ (कोंढवा) पो.स्टे. गु.क्र. १२०८/२०२४: ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन (किंमत ₹२०,०००/-)
- काळेपडळ पो.स्टे. गु.क्र. ५१/२०२६: होंडा ड्रीम युगा दुचाकी (MH 12 KU 6431) (किंमत ₹४०,०००/-)
- राजगड पो.स्टे. गु.क्र. १८५/२०२६: निळ्या रंगाची ॲक्टिव्हा मोपेड (MH 12 VR 6474) (किंमत ₹८०,०००/-)
- काळेपडळ पो.स्टे. गु.क्र. २१९/२०२६: पॅसेंजर ऑटो रिक्षा (MH 14 GC 7126) (किंमत ₹२,५०,०००/-)
- काळेपडळ पो.स्टे. गु.क्र. २९२/२०२६: हिरो स्प्लेंडर दुचाकी (MH 12 JR 9663) (किंमत ₹६०,०००/-)
एकूण जप्त मुद्देमाल: ₹४,५०,०००/-
या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे करत आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक
ही धडक कारवाई पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ६) श्री. जीवन बेनीवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (हडपसर विभाग) श्री. अतुल नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती गिरीषा निंबाळकर यांच्या सूचनेनुसार पार पडली.
या कारवाईत तपास पथकाचे प्रमुख स.पो.नि. अमित शेटे, पोलीस अंमलदार राजस शेख, प्रविण काळभोर, अमोल फडतरे, निलेश देसाई, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदिप बेडीस्कर, महादेव शिंदे आणि गिरीराज जगदाळे यांनी मोलाची कामगिरी बजावली.

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…