
पुणे: सिंहगड रस्ता परिसरातील मातोश्री चौकात होणारी दैनंदिन वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेकडून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या भागातील वाहतुकीत प्रायोगिक (तात्पुरत्या) तत्त्वावर मोठे बदल करण्यात आले असून काही मार्ग बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी मोटार वाहन कायद्यातील प्राप्त अधिकारांचा वापर करून यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. यापूर्वी या परिसरासाठी देण्यात आलेले वाहतुकीचे सर्व जुने आदेश रद्द करण्यात आले आहेत.
वाहतुकीतील महत्त्वाचे बदल आणि पर्यायी मार्ग
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या आदेशानुसार मातोश्री चौक, गिरीजा हॉटेल चौक व राजाराम पूल परिसरात खालीलप्रमाणे बदल लागू राहतील:
१. राजाराम ब्रिजकडून गिरीजा हॉटेल चौक व डीपी रोडकडे जाणारी वाहतूक:
- राजाराम पुलाकडून गिरीजा हॉटेल चौक व डीपी रोडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बॅरिकेट्स लावून शिस्तबद्ध पद्धतीने वाहतूक सोडली जाईल.
२. महालक्ष्मी लॉन्सकडून मातोश्री चौकामार्गे राजाराम पुलाकडे जाणारा रस्ता बंद:
- बदल: महालक्ष्मी लॉन्सकडून येणाऱ्या वाहनांना मातोश्री चौकातून थेट राजाराम पुलाकडे जाण्यास मज्जाव (रस्ता बंद) करण्यात आला आहे.
- पर्यायी मार्ग: या वाहनांनी गिरीजा हॉटेल चौकापर्यंत जाऊन तेथून ‘यू-टर्न’ (U-Turn) घेऊन आपल्या इच्छित स्थळी जावे.
३. गिरीजा हॉटेल चौकातून मातोश्री चौक व राजाराम पुलाकडे जाणारा ‘राईट टर्न’ बंद:
- बदल: गिरीजा हॉटेल चौकातून मातोश्री चौक व राजाराम पुलाकडे येणाऱ्या वाहनांसाठी राईट टर्न बंद करण्यात आला आहे.
- पर्यायी मार्ग: या वाहनांनी गिरीजा हॉटेल चौकातून लेफ्ट टर्न (डावे वळण) घेऊन पुढील पंक्चर (Cut-out) मधून यू-टर्न घेऊन इच्छित स्थळाकडे जावे.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनधारकांनी सुधारित पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच या परिसरात तैनात असलेले वाहतूक पोलीस आणि मदतनिस (ट्रॅफिक वॉर्डन) यांना सहकार्य करून वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन पोलीस उप-आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…