September 13, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

यवत पोलिसांची मोठी कामगिरी! CEIR पोर्टलच्या माध्यमातून ५.७५ लाखांचे २५ गहाळ मोबाईल शोधून केले मूळ मालकांच्या स्वाधीन…

यवत (प्रतिनिधी : प्रीतम सावंत): तंत्रज्ञानाची प्रभावी साथ आणि पोलिसांची अथक चिकाटी यामुळे यवत पोलिसांनी गहाळ झालेल्या तब्बल २५ महागड्या स्मार्टफोनचा शोध घेऊन ते मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत ५ लाख ७५ हजार रुपये असून, भारत सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या मदतीने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाचे मार्गदर्शन

​पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी गहाळ मोबाईलच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेतली. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला विशेष शोधमोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या.

तांत्रिक तपासातून यश

​या मोहिमेदरम्यान पोलिसांनी CEIR पोर्टलचा प्रभावी वापर करत महाराष्ट्रासह परराज्यातील मोबाईलधारकांशी सातत्याने संपर्क साधला. तांत्रिक तपास, माहितीचे सूक्ष्म विश्लेषण आणि सततचा पाठपुरावा याच्या बळावर २५ गहाळ स्मार्टफोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

​हरविलेला आणि हरवल्यामुळे दुरावलेला मोबाईल पुन्हा हातात मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत यवत पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत. नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून त्यांना परत मिळवून देण्यासाठी अशी मोहीम यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिली आहे.

यशस्वी कामगिरी करणारे पथक

​ही धडाकेबाज कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोलीस अंमलदार महेंद्र चांदणे, संदीप देवकर, रॉकी देवकाते, मारुती बाराते, धीरज जाधव, अमोल भुजबळ, सचिन गुंड, शुभम मुळे आणि दिनेश पोळ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Spread the love

You may have missed