September 13, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुणे: गुन्हे शाखा युनिट २ ची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगारांकडून पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त, तीन जण जेरबंद…

पुणे: पुणे शहरात शरीराविरुद्ध घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ ने मोठी कारवाई केली आहे. आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरी पुलाजवळ सापळा रचून पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून एक देशी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

​घटनेची पार्श्वभूमी व कारवाई

​शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार गस्त घालत असताना, युनिट २ कडील पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे आणि महेश मंडलिक यांना गोपनिय बातमी मिळाली की, आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरी पुलाखालील रोड लगत तीन संशयित इसम बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगून थांबले आहेत.

​सदरची माहिती युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला व खालील तीन संशयितांना ताब्यात घेतले:

  • राजेंद्र उर्फ राजा शिवाजी तावरे (वय ४३, रा. रांजे, ता. भोर, जि. पुणे)
  • संजय अण्णा जाधव (वय १९, रा. खेड शिवापूर, ता. हवेली, जि. पुणे)
  • प्रतिक उर्फ सोन्या बाळासाहेब तावरे (वय २५, रा. रांजे, ता. भोर, जि. पुणे)

​जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

​झडती दरम्यान आरोपींच्या ताब्यातून एक लोखंडी पिस्तूल मॅगझीनसह आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण अंदाजे ४०,८०० रुपये किमतीचा माल विनापरवाना व बेकायदेशीररीत्या बाळगल्याप्रकरणी जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत हे अग्निशस्त्र त्यांनी आपल्या एका साथीदाराकडून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

​याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३३७/२०२६ नुसार शस्त्र अधिनियम ३ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आंबेगाव पोलीस करत आहेत.

​पोलीस पथकाचे मार्गदर्शन व सहभाग

​सदर धडक कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, म. पोलीस उप-निरीक्षक तेजश्री पवार, पोलीस उप-निरी. ज्ञानेश्वर दळवी, शिवानंद कायगुडे, महेश मंडलिक, उज्ज्वल मोकाशी, नागनाथ राख, कुंदन शिंदे, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, सर्जेराव सरगर, संदीप शिर्के, विजयकुमार पवार, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, आशिष यादव, शंकर कुंभार, योगेश मांढरे, विनायक वगारे आणि रोहन खैरे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

Spread the love

You may have missed