
लोणी काळभोर : तब्बल २३ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या खून व दरोड्याच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले १४.३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लोणी काळभोर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून फिर्यादी महिलेला परत केले. ही कार्यवाही १७ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०२/२००३ नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ३९४ व ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी सोन्याचे दागिने जप्त केले होते.
मा. न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच बीएनएसएस कलम १०६(३) अन्वये आवश्यक कागदपत्रे आणि बंधपत्राची पूर्तता करण्यात आली. त्यानंतर जप्त केलेले सोन्याचे दागिने फिर्यादी अनिता दत्तात्रय टिपे (वय ४२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) यांच्या ताब्यात अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले.
फिर्यादीला परत करण्यात आलेल्या दागिन्यांमध्ये ६.३४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, ०.४८० ग्रॅम सोन्याची नथ, ४.८०० ग्रॅम सोन्याची बोरमाळ आणि २.७७० ग्रॅम सोन्याचे झुबे (जोडी) यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांचे एकूण वजन १४.३९ ग्रॅम आहे.
ही कार्यवाही लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. जुन्या गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रियेनंतर संबंधित फिर्यादीच्या ताब्यात परत मिळाल्याने पोलिसांच्या कायदेशीर कार्यवाहीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…