September 12, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

​पुणे पोलिसांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’चा बडगा; फुलगावमधील हॉटेलवर छापा, ९५ हजारांहून अधिकची अवैध दारू जप्त…

पुणे, २० ऑगस्ट २०२६: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ (Mission Crackdown) मोहिमे अंतर्गत पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीतील फुलगाव (ता. हवेली) येथील ‘हॉटेल जगदंब’वर धडक कारवाई करत पोलिसांनी विनापरवाना व बेकायदेशीररीत्या साठवलेला ९५,८६० रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

​झोन-७ मधील हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर व बेकायदेशीर दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४:४५ वाजण्याच्या सुमारास फुलगाव येथील ‘हॉटेल जगदंब’वर छापा टाकण्यात आला.

​या कारवाईदरम्यान, राहुल सुरेश संदनशिव (वय ३६, रा. फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे) हा इसम हॉटेलमध्ये विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने दारूचा साठा बाळगून असल्याचे रंगेहात आढळून आला.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

​छापादरम्यान पोलिसांनी विविध ब्रँडच्या देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे, ज्यामध्ये खालीलप्रमाणे समावेश आहे:

  • ​किंगफिशर स्ट्रॉंग आणि टँगो पंच
  • ​क्लासिक गोल्ड आणि टॅगो
  • ​इम्पेरियल ब्लू आणि मॅकडोवेलच्या विविध बाटल्या
  • ​हेवर्ड्स २००० आणि टुबॉर्ग बिअरचा साठा

​एकूण जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ९५,८६० रुपये इतकी आहे. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

​सदर कौतुकास्पद कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड आणि त्यांच्या पथकातील अंमलदार – पोलीस हवालदार सुशिल बेंद्रे, विलास केदारी, गणेश इथापे व पोलीस शिपाई हरीप्रसाद पुंडे, शुभम चिनके, अमोल सरतापे, लाडू कंडे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे यशस्वीपणे पार पाडली.

पुणे पोलिसांचे नागरिकांना आवाहन

​पुणे शहर झोन-७ अंतर्गत प्रतिबंधित गुटखा, अमली पदार्थ, अवैध दारू, जुगार आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध कठोर व सातत्यपूर्ण कारवाई अशीच सुरू राहणार आहे. नागरिकांनी गुन्हेगारी टोळ्या किंवा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांविषयी माहिती असल्यास ती निःसंकोचपणे खालील क्रमांकांवर कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.

  • श्री. अबिनाश कुमार, आयपीएस (पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७): ८८०२० ००७९३८
  • विशेष पथक, झोन-७: ९९२२७ १७९९९ / ९९२२७ ४४५९९

“आपली एक माहिती, गुन्हेगारीविरुद्ध मोठी कारवाई घडवून आणू शकते. सुरक्षित, व्यसनमुक्त आणि गुन्हेमुक्त पुण्यासाठी पुणे पोलिसांना सहकार्य करा.”

Spread the love

You may have missed