मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी जाहीर केलेल्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका करत याला ‘खुर्ची आणि अस्तित्वासाठीची युती’ असल्याचा आरोप केला आहे.

ठाकरे बंधूंची युती जाहीर, सत्ताधाऱ्यांकडून टीकेची झोड
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील राजकीय युतीची अधिकृत घोषणा झाली आहे. मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, जागावाटपाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
“युती जनतेसाठी नाही, सत्तेसाठी आहे” – एकनाथ शिंदे
या घोषणेनंतर सत्ताधारी महायुतीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर कडाडून टीका करत ही युती जनहितासाठी नसून केवळ सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असल्याचे म्हटले.
“लोकशाहीत युती-आघाड्या होत असतात. मात्र काही युती राज्याच्या विकासासाठी असतात, जशा महायुतीने गेली साडेतीन वर्षे काम करून दाखवले. पण आता ज्या युत्या होत आहेत त्या फक्त अस्तित्व टिकवण्यासाठी आहेत,” असे शिंदे म्हणाले.
“मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिलं”
महायुतीने लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये यश मिळवले असल्याचे सांगत शिंदेंनी विरोधकांवर खोचक टोला लगावला. “काही लोक मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात. आधी अंडी खाल्ली, आता कोंबडी कापायला निघाले आहेत,” असे ते म्हणाले.
‘पोरं पळवणारी टोळी’ विधानावर शिंदेंचा पलटवार
जागावाटप जाहीर न करण्यावर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ‘राज्यात पोरं पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत’ असे विधान केले होते. या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले,
“जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, ते मुंबई आणि राज्य काय सांभाळणार?”
मराठी माणसाच्या मुद्द्यावरूनही टीका
मराठी माणसाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिंदे म्हणाले, “मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जात असताना तो आठवला नाही. गिरणी कामगारांना घरं दिली का? आम्ही साडेबारा हजार लोकांना घरे दिली असून एक लाख गिरणी कामगारांना घरे देणार आहोत. मुंबईकरांना घोषणांपेक्षा विकास हवा आहे.”
“मुंबईकर सुज्ञ आहेत”
“इतकी वर्षे सत्ता असून मुंबईसाठी काय केलं? मुंबईकर सुज्ञ आहेत आणि या निवडणुकीत विकासालाच कौल देतील,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
🗣️ राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी युतीबाबत अधिक बोलण्याचे टाळत सांगितले की, “माझं उरलेलं म्हणणं मी जाहीर सभांमधून बोलेन. महाराष्ट्र कोणत्याही भांडणापेक्षा मोठा आहे, आणि तिथूनच आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला.”

More Stories
नसरापूर प्रकरणानंतर पुण्यातील पर्वती भागात ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न…
नसरापूरमध्ये ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचारानंतर खून; आरोपी ताब्यात, संतप्त ग्रामस्थांचा पुणे–सातारा महामार्गावर रास्ता रोको
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ‘डार्क हॉर्स’ पबमध्ये तरुणीचा विनयभंग; गुन्हा दाखल…