प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा नवा पुणे शहराध्यक्ष कोण होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अंकुश काकडे आणि विशाल तांबे यांच्या नावांची चर्चा असताना एका नेत्याने स्पष्ट नकार दिला आहे.

पुणे : ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा देत थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने, शरद पवार गटाला आता नव्या नेतृत्वाच्या शोधात उतरावे लागले आहे. राजीनाम्याला दोन दिवस उलटून गेले असले तरी, अद्याप नव्या शहराध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही.
सध्या पक्षाची वाटचाल सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून सुरू असल्याचे चित्र आहे. एकीकडे पुण्यातील दोन्ही राष्ट्रवादी गटांमधील आघाडीबाबत चर्चा सुरू असताना, दुसरीकडे काँग्रेससोबतही युतीसाठी हालचाली वाढल्या आहेत. या राजकीय चर्चांची जबाबदारी माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, अंकुश काकडे किंवा विशाल तांबे यापैकी एकाची शहराध्यक्षपदी वर्णी लागू शकते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, विशाल तांबे यांनी शहराध्यक्षपदाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
“मी निवडणूक लढवणार नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. मला पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. निवडणुकीला अवघे अडीच आठवडे उरले आहेत. त्यामुळे शहराध्यक्षपदात अडकवू नये, अशी विनंती मी पक्षाकडे केली आहे,” असे विशाल तांबे यांनी स्पष्ट केले.
🔸 मुंबईतील आघाडीवरही हालचाली
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने संभाव्य मित्रपक्षांचा शोध सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादीकडून १५ जागांची मागणी करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.
ठाकरे यांनी याबाबत लवकरच निर्णय कळवू, असे संकेत दिल्याचे सांगण्यात येते. महाविकास आघाडीतील पक्षांशीच प्राधान्याने आघाडी करावी, अन्यथा पर्यायी राजकीय समीकरणांचा विचार करावा, असे निर्देश शरद पवार यांनी दिल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना, राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, पुढील काही दिवसांत आघाड्यांचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

More Stories
लोणी काळभोरमधील सिद्राम मळा परिसरात चोरट्यांचा वावर; सीसीटीव्हीत तीन संशयित कैद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे क्रीडा शिक्षकाला घरात घुसून मारहाण; विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत केली कारवाईची मागणी…
आळेफाटा येथे पिकअप आणि बोलेरो यांच्यात भीषण अपघात; एक ठार, नऊ जखमी