March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

फिल्ममेकर किरण राव रुग्णालयातून डिस्चार्ज, शस्त्रक्रियेनंतर तब्येतीत सुधारणा; स्वतः शेअर केले फोटो

फिल्ममेकर किरण राव यांच्यावर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सोशल मीडियावर शेअर केली तब्येतीची अपडेट.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांची दुसरी पत्नी आणि प्रसिद्ध फिल्ममेकर किरण राव यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी किरण राव यांच्यावर 12 मिमी डायमीटर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सध्या त्यांची तब्येत सुधारत असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी किरण राव यांनी सोशल मीडियावर रुग्णालयातील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत स्वतः आपल्या तब्येतीबद्दल माहिती दिली. पहिल्या व्हिडीओमध्ये त्यांनी रुग्णालयाबाहेरील दृश्य दाखवले आहे. एका फोटोमध्ये त्यांच्या हातावर असलेला रुग्णालयाचा टॅग दिसत असून त्यावर “किरण आमिर राव खान” असे नाव लिहिलेले आहे. इतर फोटोमध्ये त्या सेल्फी घेताना आणि सोफ्यावर बसून जेवण करताना दिसत आहेत.

पोस्टमध्ये किरण राव यांनी लिहिले की,
“मी 2026 साठी पूर्णपणे तयार होते, पण माझ्या अपेंडिक्सने मला थोडं थांबायला सांगितलं. श्वास घ्या, शांत राहा आणि कृतज्ञ रहा, ही शिकवण मिळाली.”

यावेळी त्यांनी आमिर खान, चार्ल्स आणि अमीन यांच्यासह मित्रपरिवार आणि कुटुंबीयांचे आभार मानले. तसेच, डॉक्टर आणि रुग्णालयातील संपूर्ण टीमचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. ओठांवर सूज येण्यामागे ऍलर्जीक प्रतिक्रिया कारणीभूत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

किरण राव यांनी पुढे सांगितले की, आता त्या घरी परतल्या असून नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तयार आहेत. त्यांनी 2025 वर्षाबद्दल समाधान व्यक्त करत 2026 देखील चांगले जावे, अशी आशा व्यक्त केली आहे.

या पोस्टवर आयरा खान, अदिती राव हैदरी, करण जोहर, झोया अख्तर आणि श्रुती सेठ यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत किरण राव यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

किरण राव यांनी 2005 साली आमिर खान यांच्याशी विवाह केला होता. 2021 मध्ये दोघे विभक्त झाले असले तरी ते मुलगा आझाद याचे संगोपन एकत्र करत आहेत. किरण राव यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली असून 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली होती.

Spread the love