March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का; मुंबई जिल्हाध्यक्ष राखी जाधव भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत

मुंबईत शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई जिल्हाध्यक्ष राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना मुंबईत मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई जिल्हाध्यक्ष आणि पक्षाच्या निष्ठावंत नेत्या राखी जाधव या लवकरच भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडीमुळे शरद पवार गटाच्या मुंबईतील संघटनात्मक ताकदीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत मर्यादित अस्तित्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा राखी जाधव या एकहाती सांभाळत होत्या. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी वाटप आणि संघटन बांधणीमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मात्र, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (BMC Election 2026) शरद पवार गटाला फक्त 5 ते 10 जागा मिळाल्यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढली.

ठाकरे बंधूंसोबत युती असूनही कमी जागा मिळाल्याने कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांकडून राखी जाधव यांच्यावर प्रश्नांचा मारा होत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, वरिष्ठ पातळीवरून काही इच्छुक उमेदवारांना अजित पवार गटात प्रवेश करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यामध्ये माजी नगरसेवक धनंजय पिसाळ, हिंदी भाषिक सेलचे प्रमुख मनीष दुबे, गुजराती विभाग मुंबई अध्यक्ष यामिनीबेन पंचाल, नितीन देशमुख, सरचिटणीस अशोक पांचाल यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे. या सततच्या घडामोडींमुळे राखी जाधव या प्रचंड नाराज झाल्या असल्याचे सांगितले जाते.

याच पार्श्वभूमीवर, राखी जाधव या सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांना घाटकोपर येथील वॉर्डमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या संभाव्य प्रवेशामुळे शरद पवार गटाला मुंबईत मोठा संघटनात्मक धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Spread the love