साखर कारखान्यांच्या तोट्यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार अमित शहांची भेट घेणार; साखर विक्रीदर वाढवण्याची केंद्राकडे मागणी.

पुणे :
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एफआरपी (FRP) दर आणि साखर विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातील तफावतीमुळे साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रतिटन सुमारे २०० ते ३०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केले.
ही परिस्थिती लक्षात घेता साखरेच्या किमान विक्रीदरात वाढ करण्यासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यात येणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. ही भेट राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह होणार असून, शेतकरी आणि कारखान्यांच्या हिताचा निर्णय होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना शरद पवार यांनी ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, सध्या देशातील किरकोळ साखर विक्रीचा दर प्रतिक्विंटल ३,६०० ते ३,८७५ रुपयांदरम्यान आहे. काही ठिकाणी कमी दर्जाच्या साखरेचा दर ३,५०० रुपयांपर्यंत घसरला आहे. अशा परिस्थितीत एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांची देयके देताना कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडे साखरेचा किमान विक्रीदर प्रतिक्विंटल ४,१०० रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच साखर निर्यातीबाबतही परवानगी वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी १५ लाख टन साखर निर्यातीस मंजुरी देण्यात आली असून, आणखी १० लाख टन निर्यातीस परवानगी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

More Stories
लोणी काळभोरमधील सिद्राम मळा परिसरात चोरट्यांचा वावर; सीसीटीव्हीत तीन संशयित कैद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे क्रीडा शिक्षकाला घरात घुसून मारहाण; विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत केली कारवाईची मागणी…
आळेफाटा येथे पिकअप आणि बोलेरो यांच्यात भीषण अपघात; एक ठार, नऊ जखमी