March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

ताम्हिणी घाटात पुण्यातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात; २५ जण जखमी

ताम्हिणी घाटात पुण्यातील इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत २० ते २५ विद्यार्थी जखमी झाले असून माणगाव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अलिबाग |

पुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या खासगी बसचा रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बसमधील सुमारे २० ते २५ विद्यार्थी जखमी झाले असून सर्व जखमींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्यातील भोसरी परिसरातून ही विद्यार्थ्यांची बस मुरुड तालुक्यातील काशिद समुद्रकिनाऱ्यावर सहलीसाठी रवाना झाली होती. ताम्हिणी घाटातील एका धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट डोंगराच्या खडकावर आदळली. धडकेमुळे बसमध्ये बसलेले विद्यार्थी गंभीरपणे हादरले.

घटनेची माहिती मिळताच रवाळजे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढण्यात आले आणि तातडीने माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक विद्यार्थ्यांना हात, पाय व डोक्याला दुखापती झाल्या आहेत.

ताम्हिणी घाटातील अपघातांची ही गेल्या काही महिन्यांतील तिसरी मोठी घटना आहे. ऑक्टोबर महिन्यात चालत्या वाहनावर दरड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर नोव्हेंबरमध्ये थार वाहन दरीत कोसळून सहा जणांचा जीव गेला होता. आता पुन्हा बस अपघात झाल्याने या घाट मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मागील तीन वर्षांत ताम्हिणी घाट परिसरात एकूण ९५ अपघातांची नोंद झाली असून त्यामध्ये ३९ जणांचा मृत्यू आणि १७५ जण जखमी झाले आहेत. अरुंद रस्ते, तीव्र वळणे, उतार, अपुरी प्रकाश व्यवस्था, संरक्षक कठड्यांचा अभाव आणि अपुरी दिशादर्शक फलक व्यवस्था ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत.

सतत घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे कोकणाला जोडणाऱ्या घाट मार्गांवरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Spread the love