March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

बीडच्या सह्याद्री देवराईवर पुन्हा आग; वृक्षसंवर्धनावर घाला, सयाजी शिंदेंचा संतप्त सवाल – अजित पवारांची भेट घेणार

बीडमधील सह्याद्री देवराई प्रकल्पात पुन्हा एकदा आग लागल्याने सात वर्षांची वनराई जळून खाक झाली. या प्रकारावर अभिनेते सयाजी शिंदेंनी संताप व्यक्त करत पालकमंत्री अजित पवारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे.

बीड | प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धनासाठी उभारण्यात आलेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पाला पुन्हा एकदा आगीचा फटका बसला आहे. अवघ्या पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा आग लागल्याने सात वर्षांपूर्वी लावलेली झाडं जळून खाक झाली असून या घटनेमुळे वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, हा प्रकार अपघाती नसून जाणीवपूर्वक करण्यात आलेली तोडफोड असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर ते लवकरच बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सयाजी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या आगीत सुमारे 100 ते 150 झाडं जळाली होती. मात्र, दुसऱ्या घटनेत तब्बल सात वर्षांच्या मेहनतीतून उभी राहिलेली वनराई नष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सकाळी 11 वाजताच्या सुमारास एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी आग लावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

“आमची माणसं आणि वनविभागाचे अधिकारी सतत परिसरात कार्यरत आहेत. तरीही असे प्रकार घडत असतील, तर यामागे ठरवून केलेला कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असं संतप्त शब्दांत शिंदे म्हणाले.

दरम्यान, शुक्रवारी पुन्हा आग लागल्यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि सयाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने देवराई परिसराची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेचा अहवाल सादर करण्यात आला. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याबाबतही प्रशासनाशी चर्चा करण्यात आली आहे.

सह्याद्री देवराई प्रकल्प हा बीडच्या पालवन शिवारातील ओसाड डोंगर हिरवागार करण्यासाठी उभारण्यात आला होता. सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून आणि वनविभागाच्या सहकार्याने येथे हजारो झाडं आणि औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली होती. मात्र, या आगीत झाडांसह अनेक पक्षी आणि जैवविविधतेचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे.

या घटनेबाबत एबीपी माझाशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले,
“बीडमध्ये घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, पर्यावरणासाठी काम करणाऱ्यांच्या मेहनतीवर घाला घालणाऱ्यांना सोडता कामा नये.”

Spread the love