
पुणे, यवत (प्रतिनिधी: प्रीतम सावंत): पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यांपासून दुर्गम भाग तसेच एकांत वस्त्यांमध्ये घरफोड्या व जबरी चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी विशेष पथके तयार केली होती.
गोपनीय बातमीवरून सापळा रचला
दिनांक २७ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवत पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, अंमलदार विकास कापरे यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, दौंड तालुक्यातील मौजे खुटबाव गावच्या हद्दीत साळोबावस्तीकडे जाणाऱ्या रोडवर ५ ते ६ इसम बेकायदेशीर शस्त्रे आणि दरोड्याचे साहित्य घेऊन जमले आहेत. ते या भागात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत.
सदर माहितीची गंभीर दखल घेत वरिष्ठांच्या आदेशानुसार यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, LCBचे पथक आणि यवत पोलिसांच्या पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन सापळा रचला. पोलिसांनी या इसमांना घेरा घातला असता, ते पोलीस आल्याचे पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, सतर्क पोलिसांनी पाठलाग करून ५ जणांना शिताफीने ताब्यात घेतले.
जेरबंद करण्यात आलेले आरोपी:
१. अजित मुकेश राठोड (वय ५० वर्षे, रा. कुसेगाव, ता. दौंड, जि. पुणे)
२. मच्छिंद्र पोपट उर्फ काकाभाऊ राठोड (वय ३५ वर्षे, रा. कुसेगाव, ता. दौंड, जि. पुणे)
३. साम्यवेद मनिलाल उर्फ संजित राजपुत (वय २८ वर्षे, रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे)
४. दिपेश करणसिंग मनावत (वय २९ वर्षे, रा. बेहरगाव कार्ले, ता. मावळ, जि. पुणे)
५. १ विधीसंघर्षित बालक
जप्त करण्यात आलेले साहित्य:
आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताबातून खालीलप्रमाणे घातक शस्त्रे व साहित्य हस्तगत करण्यात आले आहे:
- दोन लोखंडी कोयते
- लोखंडी गज
- मिरची पावडरचे पाकीट
- दोरी व इतर साहित्य
गुन्हा दाखल व पुढील तपास सुरू
या प्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ७५१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१०(४) सह भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस (दौंड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर व त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

More Stories
पुण्यात खळबळ! विक्रीसाठी आणलेली ४ गावठी पिस्टल जप्त; खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई, एक जण जेरबंद…
दौंड तालुक्यातील दापोडी येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूवर पोलिसांची कारवाई; एकावर गुन्हा दाखल…
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…