September 13, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

दोन वर्षांपासून फरार असलेला हायप्रोफाईल इंधनचोरी प्रकरणातील मुख्य आरोपी लोणी काळभोर पोलिसांच्या जाळ्यात…

पुणे, लोणी काळभोर: कुंजीरवाडी (ता. हवेली) हद्दीतील थेऊर फाटा परिसरात तब्बल दोन वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या हायप्रोफाईल इंधनचोरी प्रकरणातील एका मुख्य फरार आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. सासवड (ता. पुरंदर) परिसरातून या आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले असून, गेल्या दोन वर्षांपासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरारी जीवन जगत होता.

​राहुल गजानन काळभोर (वय ४०, रा. तरवडी रानमळा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

काय होता नेमका प्रकार?

१० सप्टेंबर २०२४ रोजी हडपसर विभागाच्या तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या आदेशान्वये लोणी काळभोर व मुंढवा पोलिसांनी संयुक्त छापा टाकून थेऊर फाटा परिसरातील एका शेडमध्ये सुरू असलेला इंधनचोरीचा मोठा अड्डा उद्ध्वस्त केला होता. या धडक कारवाईत पोलिसांनी तीन टँकर, दोन आयशर ट्रक, एक कार आणि सुमारे १,८०० लिटर इंधन असा एकूण ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

​या गुन्ह्यात पोलिसांनी सुरुवातीला ६ ते ७ जणांना रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतरच्या तपासात आणखी काही जणांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. मात्र, या संपूर्ण रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांपैकी असलेला राहुल गजानन काळभोर हा गुन्हा घडल्यापासून सातत्याने फरार होता.

सासवडमध्ये आवळल्या मुसक्या:

लोणी काळभोर पोलिसांचे पथक या गुन्ह्यातील फरार आरोपींचा कसून शोध घेत होते. दरम्यान, तपासादरम्यान पोलीस हवालदार व अमलांना माहिती मिळाली की, फरार आरोपी राहुल काळभोर हा सासवड परिसरात लपून बसला असून तिकडे येणार आहे. या मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सासवड (ता. पुरंदर) येथे सापळा रचून राहुल काळभोर याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.

​ही यशस्वी कारवाई लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार अण्णा माने, सुरज कुंभार, प्रवीण धडस आणि सचिन सोनवणे यांच्या पथकाने पार पाडली आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Spread the love

You may have missed