
पुणे फुरसुंगी (प्रतिनिधी: प्रीतम सावंत): लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच विवाहितेचा हुंड्यासाठी आणि पतीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याची संतापजनक घटना फुरसुंगी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका २९ वर्षीय पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून फुरसुंगी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित गौतम जाधव (पती), लंका जाधव (सासू), गौतम भगवान जाधव (सासरे), सागर जाधव (दीर) आणि छाया कांबळे (नणंद) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
साडेबारा लाखांचा खर्च करूनही छळ सुरूच
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचा विवाह १ मे २०२२ रोजी रोहित जाधव याच्यासोबत झाला होता. या लग्नासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी सुमारे १२.५ लाख रुपये खर्च केले होते, तसेच दागिने आणि संसारोपयोगी साहित्यही दिले होते. विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेले. मात्र, हनिमूनवरून परतताच सासरच्या मंडळींनी किरकोळ कारणांवरून वाद घालण्यास सुरुवात केली.
पतीवर असलेले ३ लाख रुपयांचे जुने कर्ज फेडण्यासाठी आणि हनिमूनचा खर्च भागवण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये, असा तगादा सासरच्यांनी लावला. मुलीचा संसार वाचावा या हेतूने तिच्या वडिलांनी व्याजाने पैसे काढून ३ लाख रुपये जावयाला दिले. तरीही सासरच्या लोकांचा हावरेपणा कमी झाला नाही.
’तू वांझोटी आहेस’; पतीकडूनही वारंवार अपमान
पैसे मिळूनही विवाहितेला सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली जात होती. पती रोहित हा ‘तू दिसायला चांगली नाहीस, मी तुझ्याशी जबरदस्तीने लग्न केले’ असे म्हणून हिणवत असे. तसेच, अपत्य होत नसल्याच्या कारणावरून ‘तू वांझोटी आहेस’ असे टोमणे मारून तिचा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला. तिला माहेरी जाण्यावरही बंदी घालण्यात आली होती आणि तिने या जाचाला विरोध केल्यास तिला शिवीगाळ व मारहाण केली जात असे.
शेवटी माहेरी घेतला आश्रय
सासरच्या लोकांकडून होणारा हा शारीरिक आणि मानसिक त्रास सहनशक्तीच्या पलीकडे गेल्याने अखेर हताश होऊन विवाहितेने आपले माहेर गाठले. तेथे कुटुंबीयांना सर्व आपबिती सांगितल्यानंतर तिने फुरसुंगी पोलीस ठाण्यात जाऊन सासरच्यांविरोधात रीतसर तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…