
पुणे : खराडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यातील गेल्या दीड वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथून जेरबंद केले. सुनिल रविंद्र पाटील (वय ३०, रा. राजाराम पाटील नगर, खराडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट ७ चे पथक वरिष्ठांच्या आदेशानुसार पाहिजे आरोपींचा शोध घेत होते. यावेळी पोलीस अंमलदार किरण पलांडे यांना मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे सुनिल पाटील हा जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथे लपून राहत असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांच्या नेतृत्वाखाली पथक जयसिंगपूर येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत असताना तो गल्ली क्रमांक २१, दसरा चौक परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचून १९ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे दोनच्या सुमारास सुनिल पाटील याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव व पत्ता सांगितला. सध्या तो शिरोळ तालुक्यातील शाहूनगर परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुनिल पाटील याच्याविरुद्ध खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६६/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाच्या (मोक्का) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी खराडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांच्यासह भरत उकीर्डे, सारंग दळे, विनायक साळवे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, निर्णय लांडे, अमोल ढोणे, विकास कदम, सुहास तांबेकर, किरण पलांडे, भरत गुंडवाड तसेच महिला पोलीस अंमलदार नेहा तापकीर आणि प्रतिक्षा पानसरे यांचा सहभाग होता.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…