July 29, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

सोशल मीडियावर मैत्री केली अन् घरालाच गंडा घातला! १४ लाखांचा ऐवज लांबवणाऱ्या भामट्याला गुजरातमधून अटक; कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…

विशेष प्रतिनिधी: रोहन काशीद | पुणे

पुणे: सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन घरातून तब्बल १४ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज लांबवणाऱ्या एका भामट्याला कोंढवा पोलिसांनी गुजरात राज्यातील वडोदरा येथून शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेले १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि मुद्देमाल असा एकूण १४ लाख ३९ हजार ४९६ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

​येश कैलास भुलचंदानी (वय २४, रा. गाव मोहाडी, हत्तीपुरा, ता. विजापूर, जि. मेहेसाणा, राज्य गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

​कशी घडली घटना?

​पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून २०२६ रोजी फिर्यादी महिला राहत्या घरी असताना, त्यांची सोशल मीडियावरून ओळख झालेला मित्र यश हा त्यांना भेटण्यासाठी कोंढवा खुर्द येथील घरी आला होता. दरम्यान, फिर्यादी महिला त्याच सोसायटीत राहणाऱ्या त्यांच्या मावशीच्या घरी जेवणाचा डबा देण्यासाठी गेल्या. या संधीचा गैरफायदा घेत यश याने बेडरुममधील कपाटात ठेवलेली २४,००० रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण १४,६३,४९६ रुपयांचा ऐवज चोरून पळ काढला.

​या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४९४/२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​तांत्रिक विश्लेषणावरून गुजरात गाठले

​गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तातडीने तपास सुरू केला. तपास पथकातील पोलीस अंमलदार केशव हिरवे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी गुजरात राज्यातील वडोदरा येथे असल्याचे निष्पन्न झाले.

​या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, राहुल रासगे आणि केशव हिरवे यांचे पथक गुजरातला रवाना झाले. तेथील गोरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुभानपुरा, आयपीसीएल रोड (वडोदरा) येथून आरोपी यश भुलचंदानी याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

​१६ तोळे सोन्याचे दागिने जप्त

​अटक केलेल्या आरोपीकडून पोलिसांनी चोरीस गेलेले १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण १४,३९,४९६ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलीस प्रशासनाचे आवाहन:

सोशल मीडियावरून झालेल्या अनोळखी व्यक्तींच्या मैत्रीवर अंधाधुंद विश्वास ठेवू नका. अशा व्यक्तींना घरी बोलावणे किंवा घराबाबतची गोपनीय माहिती देणे धोक्याचे ठरू शकते. नागरिक किंवा महिलांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

​या पथकाने केली कामगिरी

​ही कारवाई पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ५) श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (वानवडी विभाग) श्री. रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष खेतमाळस आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. प्रशांत मंडले यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे तसेच पोलीस अंमलदार अमोल हिरवे, रवींद्र चिप्पा, विशाल मेमाणे, राहुल शितोळे, केशव हिरवे, राहुल रासगे, पुष्पेंद्र चव्हाण, अमित सूर्यवंशी, संतोष बनसुडे, रियाज पटेल, राहुल शेलार, रशीद शेख, सूरज शुक्ला, शाहिद रजपूत व ओंकार शेटे यांच्या पथकाने केली.

Spread the love