
लोणी काळभोर, (प्रतिनिधी: प्रीतम सावंत) : मोबाईल गेम खेळण्याच्या कारणावरून घरात झालेल्या वादानंतर घराबाहेर पडलेला १६ वर्षीय विद्यार्थी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असून, त्याचा शोध घेण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. आयुष जगदीश कानतोडे असे बेपत्ता विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयुष हा हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती परिसरातील रिटर्न व्ह्यू सिटी येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवून यश संपादन केले होते. दरम्यान, मोबाईलवर गेम खेळण्याच्या कारणावरून कुटुंबीयांमध्ये वाद झाल्यानंतर २७ जून रोजी तो घरातून बाहेर पडला.
घरातून निघताना “मी हॉटेलमध्ये काम करणार आहे,” असे आयुषने कुटुंबीयांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यानंतर त्याचा कोणताही संपर्क झालेला नसून, गेल्या चार दिवसांपासून त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून विविध ठिकाणी चौकशी आणि शोधकार्य सुरू आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून, आयुषचा शोध घेण्यासाठी विशेष पथकेही कार्यरत आहेत.
आयुष कानतोडे याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ नाळे (८३२१८६९६७५) किंवा लोणी काळभोर पोलिस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी केले आहे.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…