
लोणी काळभोर: हवेली तालुक्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असलेल्या ‘लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थे’च्या निवडणुकीत नवीन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेत रमेश यशवंतराव भोसले यांची अध्यक्षपदी, तर राजश्री उदय काळभोर यांची उपाध्यक्षपदी सर्वसंमतीने निवड झाली आहे.
संस्थेच्या मागील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने, रिक्त झालेल्या पदांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तळपे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रक्रियेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने, या दोन्ही पदांची निवड बिनविरोध झाली.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित अध्यक्ष रमेश भोसले म्हणाले, “सोसायटीचा कारभार पूर्णपणे पारदर्शक ठेवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज उपलब्ध करून देणे, मध्यम मुदत कर्जवाटप आणि सभासदांच्या कल्याणासाठी नवीन योजना राबविण्यावर आमचा भर राहील. संचालक मंडळ आणि सर्व सभासदांना विश्वासात घेऊन आम्ही संस्थेचा विकास करू.”
या निवडीप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. सन १९१७ पासून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या या संस्थेच्या या निवडीकडे स्थानिक राजकारणातही महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…