
पुणे : बुधवार पेठेतील सपना बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या कथित अनैतिक मानवी वाहतूक व वेश्या व्यवसायावर पुणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने (AHTC) कारवाई केली. १२ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत दोन बांगलादेशी तरुणींची सुटका करण्यात आली असून, एका महिलेसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना बुधवार पेठेतील शनी मंदिराजवळील सपना बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला.
माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिस पथकाने संबंधित फ्लॅटवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या दोन बांगलादेशी तरुणींची सुटका करण्यात आली.
या प्रकरणात शुली बेगम अफजल शेख उर्फ प्रिती रणजीत पात्रा (वय ३९) आणि रणजीत गदाधर पात्रा (वय ४२) यांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी १३ ऑगस्ट २०२६ रोजी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १४३(३), ३(५) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा, १९५६ (PITA) मधील कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फरासखाना पोलीस करत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…