September 12, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुणे: वानवडीत ज्येष्ठ महिलांच्या अंगावरील मंगळसूत्र हिसकावणारा अट्टल चोरटा जेरबंद; गुन्हे शाखा युनिट ५ ची धडक कारवाई…

पुणे: पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याने चाललेल्या ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मंगळसूत्र जबरीने चोरी करणाऱ्या एका कुख्यात चोराला पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ०५ ने शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीसह चोरीचे सोन्याचे दागिने विकत घेणाऱ्या त्याच्या साथीदारालाही बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

​घटनेची पार्श्वभूमी

​२४ जुलै २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात इसमाने रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०४ (२) अन्वये सोन-साखळी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला.

​कसून तपास आणि सापळा रचून कारवाई

​गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळाकडील परिसरातील तब्बल १५० ते २०० सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांची बारकाईने पाहणी केली. तसेच, यापूर्वी असे गुन्हे केलेल्या रेकॉर्डवरील आरोपींची माहिती गोळा करण्यात आली.

​दरम्यान, गोपनीय बातमीदारांमार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, रेल्वे बोगद्याजवळ, सुरक्षानगर, हडपसर पुणे येथे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे युनिट ५ च्या पथकाने तातडीने हडपसर येथील निर्धारीत ठिकाणी सापळा रचून आरोपी हादीहसन सर्फराज ईराणी याला ताब्यात घेतले.

​पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने वानवडी परिसरातील सोन-साखळी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच, चोरी केलेले दागिने त्याने त्याचा ओळखीचा इसम जुनैद ईस्माईल कुरेशी याला विकण्यासाठी दिल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दागिने विकत घेणाऱ्या जुनैदलाही ताब्यात घेतले.

​अटक करण्यात आलेले आरोपी

​१. हादीहसन सर्फराज ईराणी (वय २५ वर्षे, रा. प्लॉट नंबर ८, ईराणी गल्ली, पाटकर प्लॉट, महात्मा गांधी वसाहत, शिवाजीनगर, पुणे) – मुख्य आरोपी (चोरटा)

२. जुनैद ईस्माईल कुरेशी (वय २३ वर्षे, रा. गल्ली नंबर १, जाफरीन लाईन, कॅम्प, पुणे) – चोरीचे दागिने विकत घेणारा

जप्त केलेले मुद्देमाल: गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल. दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी वानवडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

​उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस पथक

​सदरची धडक कारवाई पुणे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ०५ चे पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, तसेच पोलीस अंमलदार शशिकांत नाळे, परमेश्वर कदम, शहाजी काळे, राहुल ढमढेरे, प्रताप गायकवाड, अकबर शेख, नासेर देशमुख व सुधीर सोनवणे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

Spread the love

You may have missed