
प्रतिनिधी: अमित मुंडीक,
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी परिसरात बुधवारी पहाटे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे. ऊसतोड कामगार असलेल्या दाम्पत्याची अवघ्या 5 वर्षीय चिमुकलीला बिबट्याने आई-वडिलांच्या शेजारी झोपेतून उचलून नेले. आपल्या डोळ्यांसमोर मुलीला बिबट्या घेऊन जात असल्याचे पाहून आई-वडिलांनी आरडाओरडा करत तिचा जीव वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. काही वेळाने शेजारील ऊसाच्या शेतात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला.
ही घटना 22 जुलै रोजी पहाटे सुमारे 2.45 वाजण्याच्या सुमारास घडली. चिमुकलीला आपल्या आई-वडिलांसोबत घराशेजारील गोठ्यात झोपली होती. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने गोठ्यात प्रवेश करत चिमुकलीला तोंडात धरून पळ काढला.
सहाय्यक वनसंरक्षक (ACF) स्मिता कुलकर्णी यांनी सांगितले की, “आई-वडिलांना जाग आल्यानंतर मुलगी शेजारी नसल्याचे लक्षात आले. त्याचवेळी बिबट्या त्यांच्या डोळ्यांसमोर मुलीला घेऊन जात होता. त्यांनी तिची सुटका करण्याचा प्रयत्न केला, पण बिबट्या तिला शेजारील ऊसाच्या शेतात घेऊन गेला. घटनेची माहिती आम्हाला अवघ्या 15 मिनिटांत मिळाली. त्यानंतर रात्री 3.15 वाजता आमचे पथक घटनास्थळी पोहोचले.”
वन विभागाच्या पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. काही वेळानंतर ऊसाच्या शेतात त्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक राजहंस आणि वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली. शासनाच्या नियमानुसार मृत मुलीच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, हल्लेखोर बिबट्या अद्यापही वन विभागाच्या हाती लागलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून परिसरात पिंजरे लावण्यात आले आहेत. कॅमेरा ट्रॅप बसविण्यात आले असून ड्रोनच्या सहाय्यानेही शोधमोहीम सुरू आहे. तसेच रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे.
वन विभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न पडण्याचे, लहान मुलांना एकटे सोडू नये आणि बिबट्याचे दर्शन झाल्यास तात्काळ वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे पिंपळसुटी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, एका गरीब ऊसतोड कामगार कुटुंबातील निरागस चिमुकलीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. वन विभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्याचा दावा केला असला, तरी बिबट्या अद्याप मोकाट असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती कायम आहे.

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…