
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोणी काळभोर अपर तहसील कार्यक्षेत्राअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मंजूर करण्यात आलेले सेतू सुविधा केंद्र पुणे महानगरपालिका हद्दीत येणाऱ्या मांजरी बुद्रुक येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव रद्द करून ते लोणी काळभोर येथेच ग्रामीण भागात कार्यान्वित ठेवण्याची मागणी खासदार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांनी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे की, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, थेऊर, कदमवाकवस्ती, नाळवाडी, आळंदी म्हातोबाची तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना विविध शासकीय सेवा सुलभ व जलदगतीने उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सेतू सुविधा केंद्रास मान्यता देण्यात आली आहे.
सदर केंद्र ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे असून ते पुणे महानगरपालिका हद्दीतील मांजरी बुद्रुक येथे स्थलांतरित झाल्यास नागरिकांना अतिरिक्त अंतराचा प्रवास करावा लागेल. त्यामुळे वेळ, आर्थिक खर्च आणि श्रम वाढण्याची शक्यता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तसेच दाखले, प्रमाणपत्रे, उत्पन्न व जात पडताळणी, महसूल विषयक अर्ज आणि इतर शासकीय सेवांसाठी नागरिकांना या केंद्राचा मोठा लाभ होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ग्रामपंचायत लोणी काळभोर ग्रामपंचायतने सेतू केंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविल्यामुळे जागेच्या उपलब्धतेचा प्रश्नही उद्भवत नसल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांच्या हिताचा विचार करून सेतू सुविधा केंद्राचे प्रस्तावित स्थलांतर रद्द करण्यात यावे आणि सेतू केंद्र लोणी काळभोर येथेच कार्यान्वित ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात याव्यात, अशी विनंती डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…