March 23, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

“मुंबई महापालिका निवडणूक मराठी माणसाची नाही, ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीका करत ही लढाई मराठी माणसाची नसून त्यांच्या राजकीय अस्तित्वाची असल्याचे म्हटले आहे.

Mumbai Municipal Election 2026:
मुंबई महापालिका निवडणूक प्रचारात राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपांचा जोर वाढला आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वाचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे बंधूंकडून होत असलेल्या प्रचारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

साम टीव्हीच्या “ब्लॅक अँड व्हाईट” या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “ही निवडणूक मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी नाही, तर ठाकरे बंधूंच्या राजकीय अस्तित्वासाठी लढली जात आहे.”

ते पुढे म्हणाले की, “मराठी माणसाचे अस्तित्व कोणीही संपवू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला मराठी माणूस हा आत्मविश्वासू आणि सक्षम आहे. मुंबईत मराठी माणसाचे वर्चस्व कायम राहील.”

ठाकरे बंधूंवर टीका करताना त्यांनी स्पष्ट केले की, “ठाकरे बंधूंनी स्वतःला मराठी माणूस किंवा संपूर्ण महाराष्ट्र समजणे थांबवावे. निवडणूक हरल्यास पक्षाचे अस्तित्व संपेल, अशी भीती त्यांना आहे.”

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दक्षिण मुंबईतील मराठी नागरिकांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही उपस्थित केला. बीडीडी चाळींचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित ठेवण्यात आला, कारण बिल्डर्समध्ये अधिक रस होता, असा आरोप त्यांनी केला. “आम्ही ठाम निर्णय घेतला की बीडीडी चाळींचा पुनर्विकास बिल्डर नव्हे, तर म्हाडाच करणार,” असेही त्यांनी सांगितले.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची साक्ष देणाऱ्या पत्राचाळीच्या पुनर्विकासाबाबतही त्यांनी शिवसेनेवर टीका केली. “या चाळीतील रहिवाशांना रस्त्यावर आणण्याचे काम झाले, पण आमच्या सरकारने त्यांना त्यांची घरे परत मिळवून दिली,” असे फडणवीस म्हणाले.

शेवटी त्यांनी ठाकरे बंधूंवर थेट आरोप करत सांगितले की, “मराठी माणसाचे नाव घेऊन राजकारण करण्यापलीकडे त्यांनी काहीही ठोस काम केलेले नाही.”

Spread the love